लोणावळा : बंगळुरू येथे खोदकाम करताना सोन्याची विट आणि हिरे सापडल्याची बतावणी करुन एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या संचालकाची दहा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने एकास अटक केली.

भीमा गुलशन सोलंकी (मूळ रा. बडोदा, गुजरात, सध्या रा. देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या संचालकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार मुंबईत राहायला आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची लोणावळा परिसरात सोळंकी यांच्याशी भेट झाली होती. बंगळुरू येथे एक जुनी वास्तू पाडण्यात आली. तेथे मला सोन्याच्या विटा आणि हिरे असलेली पिशवी सापडली असल्याची बतावणी सोलंकीने त्यांच्याकडे केली होती.

हेही वाचा >>> पुणे : समाजमाध्यमावरील ओळखीतून तरुणाची आर्थिक फसवणूक ; वकिलाच्या विरोधात गुन्हा

सोन्याच्या विटा आणि दागिन्यांची विक्री करायची असल्याचे आमिष सोलंकीने त्यांना दाखविले होते. त्यानंतर त्यांच्याकडून दहा लाख रुपये सोलंकीने घेतले. त्या बदल्यात बनावट सोन्याची विट आणि हिरे देऊन सोलंकी पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त मितेश घट्टे यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश तपास पथकाला दिले. लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, सचिन रावळ, प्रकाश वाघमारे, हनुमंत पासलकर आदींनी सोलंकीला सापळा लावून ताब्यात घेतले.

Story img Loader