पुण्यातील हिंजवडीत आयटी अभियंता वंदना द्विवेदीची प्रियकर ऋषभ निगमने गोळ्या झाडून हत्या केली. गंभीर बाब म्हणजे, ऋषभने पाच गोळ्या वंदनावर झाडल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. चारित्र्याच्या संशयावरून त्याने ही हत्या केल्याचं प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. वंदना ही हिंजवडीत नामांकित कंपनीत आयटी अभियंता म्हणून काम करते, तर ऋषभ हा लखनऊमध्ये रिअल इस्टेट ब्रोकरचे काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ तारखेला साडेनऊच्या सुमारास हिंजवडीतील हॉटेल ओयो टाऊन हाऊस याठिकाणी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रियकर ऋषभला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ऋषभ आणि वंदना हे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. याचेच रुपांतर प्रेमात झालं होतं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून वंदना ही हिंजवडीत काम करत होती तर ऋषभ हा लखनऊमध्ये होता. ऋषभ हा वंदनाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा.
हेही वाचा – परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; साताऱ्यातील सातजणांविरुद्ध गुन्हा
२५ जानेवारी रोजी ऋषभ पुण्यात आला. हिंजवडीतील हॉटेल ओयो टाऊन हाऊसमध्ये ३०६ नंबरची रूम बुक केली. तिथं २७ तारखेला वंदना आणि ऋषभ यांच्यात काही वाद झाले. मग, आधीच तयारीत आलेल्या ऋषभने वंदनावर पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वंदनाला सोडून ऋषभ तिथून फरार झाला. त्याला नाकाबंदी दरम्यान मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन केले.