पुणे : पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये जागेवरून प्रवाशांची भांडणे ही नित्याचीच बाब झाली आहे. आता यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने गाडीला अतिरिक्त एक डबा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. द्वितीय श्रेणी चेअर कारचा हा डबा असून, यामुळे गाडीची प्रवासी क्षमता १०८ ने वाढणार आहे.
मागील काही काळात सिंहगड एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची वारंवार भांडणे होण्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: पासधारक आणि नवीन प्रवासी यांच्यात हे वाद होतात. प्रवाशांमध्ये नुकतीच हाणामारीची घटनाही घडली होती. पासधारकांनी पुढील स्थानकात गाडीमध्ये चढणाऱ्या सहप्रवाशासाठी जागा धरली होती. दुसऱ्या प्रवाशाने त्या जागेवर बसण्याचा प्रयत्न केल्यानंतर पासधारकांच्या गटाने त्याला बेदम मारहाण केली होती. पुणे-मुंबई दरम्यान प्रवाशांची संख्या वाढली तरी गाडीची क्षमता मात्र, वाढलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये वरचेवर वाद होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी रेल्वेने सिंहगड एक्स्प्रेसमध्ये द्वितीय श्रेणी चेअर कारचा डबा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिंहगड एक्स्प्रेसची प्रवासी क्षमता १०८ ने वाढणार आहे.
हेही वाचा – पुणे : बिबवेवाडीत टोळक्याकडून दुकानदारासह दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार
हा नवीन डबा १ मेपासून जोडला जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून सिंहगड एक्स्प्रेस १६ डब्यांसह धावणार आहे. आता सिंहगड एक्स्प्रेसला १ एसी चेअर कार, १३ द्वितीय श्रेणी चेअर कार, १ सामान व गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कारसह एकूण १६ डबे असणार आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली.
हेही वाचा – पुणे : मेट्रोच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल अजूनही मिळेना
सिंहगड एक्स्प्रेसला एक डबा जोडून समस्या सुटणार नाही. उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे गर्दी जास्त असून, गाडी किमान २४ डब्यांची करायला हवी. असे घडले तरच गर्दीतून प्रवाशांची काही प्रमाणात सुटका होईल, असे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.