लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘महाराष्ट्राला विनोद आणि विडंबनाची मोठी परंपरा आहे.“गाढवाचं लग्न’ आणि ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकांतून तत्कालीन पुढारी समोर बसलेले असताना त्यांच्यावर राजकीय कोटी करण्यात येत असे. त्याच्यावर न रागवता ते नितळ हसण्याने त्याला दाद देत. विनोदाला रागवण्यापेक्षा त्यामुळे अंतर्मुख होणे जास्त महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.
सध्याच्या काळात ही सहनशीलता, सहिष्णुता कोठे आहे, याचा राजकारण्यांनी विचार करावा. कलाकारांनी देखील करमणूक म्हणजे केवळ विनोद आहे की त्यातून काही सर्जनशील साधायचे आहे याचा विचार करावा, अशा शब्दात आळेकर यांनी राजकारणी आणि कलाकार अशा दोघांचेही सध्या एका विडंबनात्मक गाण्यामुळे राजकीय क्षेत्रात उठलेल्या वादळाचा संदर्भ देत कान टोचले.
जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने रमणबाग प्रशालेत आयोजित आजी-माजी विद्यार्थी कलाकारांच्या स्नेहमेळाव्यात जनस्थान पुरस्काराचे मानकरी आणि शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या आळेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. रोटरी इंटरनॅशनलच्या मानव विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप देशपांडे, डॉ. विनय कुमार आचार्य, संगीतकार अजय पराड, व्हायोलिन ॲकॅडमीचे पं. अतुलकुमार उपाध्ये, मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई, सुहास देशपांडे रवींद्र सातपुते या वेळी उपस्थित होते.
आळेकर म्हणाले, ‘नाटक हा समाजाचा आरसा असतो. समाजात घडणाऱ्या विविध घटना आणि प्रवृत्ती यांचे प्रतिबिंब नाटकात उलटे सुलटे किंवा तिरके अशा कोणत्यातरी स्वरूपात निश्चितपणे दिसून येत असते. कलाकाराने आपल्या कलाकृतीतून नेमके काय मांडायचे, हे विचार करून ठरवायचे असते. संपूर्ण देशभरात मराठी नाटक हे आघाडीचे आणि प्रयोगशील मानले जाते. सध्या नाटकांना सुगीचे दिवस आहेत. नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना आणि येऊ इच्छिणाऱ्यांना देखील नाटकांमध्ये आपण नेमके काय करायचे, याची स्पष्ट जाणीव असणे आवश्यक आहे. लोकप्रिय नाटक करायचे की अधिक चांगले नाटक करायचे यापैकी एका गोष्टीची निवड करण्याची वेळ त्यांच्यावर केव्हा ना केव्हा येणार आहे.’
नाट्य रसिक सदानंद आचवल यांच्या स्मृत्यर्थ त्यांचे मित्र व अमेरिका येथील नाट्यप्रेमी अनिल प्रयाग यांनी नाट्य क्षेत्रात आश्वासक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण आळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्युष महामुनी या विद्यार्थ्याला नाट्य आराधना पुरस्कार तर आयुष दुसाने याला नाट्य प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.