लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : इंग्रजीच्या आग्रहामुळे भारतीय भाषांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या भाषांतील शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण झाली आहे. तर इंग्रजी येणाऱ्यांना आपल्याला सगळे कळते असे वाटते. स्थानिक भाषेतील लेखकही इंग्रजीकडे वळताना दिसत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी पाल्यांना मातृभाषेत शिक्षण देणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी मांडले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे झालेल्या ‘आंतरभारती संवाद’ या मुक्तसंवाद कार्यक्रमात डॉ. भैरप्पा बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी चारूशीला गायके, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, संदीप पालवे, बागेश्री मंठाळकर, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, सहना विजयकुमार, ज्येष्ठ अनुवादिका उमा कुलकर्णी, उमा राव, पाली आणि बुद्धिस्ट अभ्यास विभागप्रमुख डॉ. महेश देवकर, हिंदी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार रोडे, सस्कृत-प्राकृत विभागप्रमुख डॉ. देवनाथ त्रिपाठी, मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, परकीय भाषा विभागप्रमुख डॉ. स्वाती आचार्य या वेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-पालख्यांचे प्रस्थान होताच इंद्रायणीच्या पाण्यावर पुन्हा तवंग, दक्षता पथके अनभिज्ञ
डॉ. भैरप्पा यांनी आपला लेखनप्रवास या कार्यक्रमात उलगडला. माझ्या मनात कादंबरीकार होण्याचा विचार आल्यावर मी त्याचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी दोन वर्ष मी व्रत घेतल्याप्रमाणे महत्त्वाच्या २५ कादंबऱ्या, त्यांचे विश्लेषण करणारी पुस्तके वाचली. त्यामुळे मला सर्जनशील लेखनाची भाषा, पद्धतीची माहिती मिळाली. एका पुस्तकावर समाधानी होणारे लेखक होऊ नका. यशस्वी लेखक, कादंबरीकार होण्यासाठी सर्जनशील लेखन करावे लागेल. त्यासाठी व्यासंग असणे आवश्यक आहे. सर्जनशील लेखनासाठी संशोधनाची बैठक गरजेची आहे, असे त्यांनी सांगितले.
शास्त्रीय संगीत ऐकल्याने लेखनाला स्थिरता
शास्त्रीय संगीत ऐकल्याने लेखनाला स्थिरता मिळते. त्यामुळे लेखन अधिक परिणामकारक होते. सर्जनशील लेखनासाठी लेखकाने रोज शास्त्रीय संगीत ऐकले पाहिजे, असेही डॉ. भैरप्पा म्हणाले.