पुणे : ‘देशातील शिक्षणामध्ये खूप विषमता आहे. सगळीकडे गरीब-श्रीमंतांना सारखे शिक्षण असले पाहिजे. शिक्षणातील विषमता दूर झाली पाहिजे. तसेच चांगले आयुष्य जगण्यासाठी पर्यावरण रक्षणाची जाणीव-जागृती गरजेची आहे,’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी मांडले.
‘ऑटो इम्युन ब्लिस्टरिंग डिसिज फाऊंडेशन’तर्फे गोंदण पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांना ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डेक्कन जिमखाना येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रवीण जोशी यांनी आमटे दाम्पत्याशी संवाद साधला. फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त अशोक सूरतवाला, डॉ. शरद मुतालिक, डॉ. सुनील वर्तक या वेळी उपस्थित होते.
आमटे दाम्पत्याने त्यांच्या आजवरच्या वाटचालीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. आमटे म्हणाले, ‘आज मागे वळून पाहताना परिपूर्ण आयुष्य जगलो, असे वाटते. जे काही काम झाले, त्या विषयी समाधान वाटते. आम्ही आमचे निर्णय स्वयंप्रेरणेने घेतले. अभावात आनंद मानला. शहरी माणसांमध्ये जास्त अंधश्रद्धा आहेत. शहरातील आयुष्यापेक्षा वेगळे विश्व, लोक आहेत हे समजून घेतले पाहिजे. आपल्या गरजा किती वाढवायच्या हे दुसऱ्याचे जगणे पाहून समजते. आम्ही काही अपेक्षा न ठेवता काम केले. त्यामुळे जे मिळाले ते पचवणे अवघड आहे.’
‘आपल्या कामातून आनंद घेणे, त्यात लोकांना सहभागी करून घेणे म्हणजे सुखाचे आयुष्य असते. काळानुसार होणारे बदल स्वीकारत पुढे जात राहिलो,’ असे डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सांगितले.
‘विरोध करणाऱ्यांना चिरडले जाते अशी स्थिती’
‘आपण वीज, पाणी खर्च करत निसर्गावर बोजा टाकतो. निसर्गात साधेपणाने राहणाऱ्यांवर दोष टाकतो. व्याघ्र प्रकल्पांतून वाघांची संख्या अतोनात झाली आहे. त्यामुळे ते खाण्याच्या शोधात बाहेर पडतात. कोणाला कोंबडी मिळते, कोणाला माणूस मिळतो. वाघांच्या अधिवासावर सर्वांनीच अतिक्रमण केले आहे. समाजातील आर्थिक दरी, शहरातील सुशिक्षित आणि निसर्गात राहणारे यांच्यातील दरी कमी होईल तेव्हा या देशात काही तरी चांगले व्हायला लागेल. आधुनिक तंत्रज्ञानामुळे खूप माहिती मिळते, ही माहिती मिळण्यातून काही तरी प्रगती होण्याची अपेक्षा आहे. मच्छिमारांवर प्रदूषणकारी प्रकल्प लादले जात आहेत. विरोध करणाऱ्यांना चिरडले जाते, अशी देशात स्थिती आहे,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी मांडले.