पुणे : यंदाच्या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीची किंवा थंडीच्या लाटांची शक्यता कमी आहे. कडाक्याची थंडी पडलीच तर ती कमी काळासाठी असेल. शिवाय डिसेंबर महिन्यात कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. महापात्रा म्हणाले, यंदाच्या हिवाळ्यात डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात कडाक्याची थंडी पडण्याची किंवा थंड लाटांची शक्यता कमी आहे. कडाक्याची थंडी पडलीच तर ती, कमी काळासाठी असेल. डिसेंबर महिन्यात कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. यंदाचा नोव्हेबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण ठरला आहे. डिसेंबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे सोमवारी, तीन डिसेंबर रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्याकडे झेपावेल. त्यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा फारसा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान ढगाळ राहण्याची आणि हवेत आद्रर्तचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – पिंपरी चिंचवड : मराठी भाषेत पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करा, अन्यथा…; मनसेची मागणी

यंदाचे वर्ष सर्वाधिक उष्ण

यंदाचे वर्ष हवामान शास्त्राच्या १७४ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक उष्ण ठरण्याचा अंदाज आहे. १८५० ते १९०० या काळातील सरासरी तापमानाच्या तुलनेत यंदा जागतिक तापमानात सुमारे १.४० अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष आजवरचे सर्वात उष्ण वर्ष ठरणार आहे. पण, आम्ही डिसेंबर महिन्यातील जागतिक तापमानाच्या नोंदींवर लक्ष ठेवून आहोत, असेही महापात्रा म्हणाले. दरम्यान, यंदा जुलै, ऑगस्ट, सप्टेबर आणि ऑक्टोबर महिनेही सरासरीपेक्षा उष्ण ठरले आहेत.

हेही वाचा – मराठा समाजाच्या सामाजिक मागसलेपणाच्या सर्वेक्षणाचे निकष अंतिम, प्रस्ताव राज्य सरकारकडे

एल-निनो निष्क्रिय होणार; पुढील पावसाळ्यावर परिणाम नाही

प्रशांत महासागरात सक्रिय असणाऱ्या एल-निनो या हवामान विषयक प्रणालीने जगात हाहाकार माजविला आहे. तापमान वाढ, दुष्काळ, अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना जगाला करावा लागत आहे. अन्नधान्य उत्पादनात होणाऱ्या संभाव्य घटीचा सामना कसा करायचा, असा प्रश्न जगाला भेडसावत आहे. ती एल-निनो प्रणाली डिसेंबरअखेर सक्रीय राहण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी २०२४ नंतर एल-निनो निष्क्रीय होण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे २०२४च्या मोसमी पावसाच्या हंगामावर एल-निनोचा कोणताही परिणाम असणार नाही. या काळात हिंद महासागरीय द्वि- धुविता (इंडियन ओशन डायपोल) ही निष्क्रीय होईल, अशी माहितीही डॉ. महापात्रा यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is not cold this year forecast by meteorological department december will also be warmer than average pune print news dbj 20 ssb
Show comments