लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : घरगुती सौर ऊर्जा ग्राहकांना ‘टाइम ऑफ डे’ अर्थात टीओडी पद्धत लागू होणार नाही, असे राज्य वीज नियामक आयोगाने स्पष्ट केले असल्याची माहिती सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दिली. सौर ऊर्जेद्वारे साठवलेली वीज कोणत्याही वेळेत वापरण्याची मुभा घरगुती सौर ऊर्जा ग्राहकांना मिळणार असल्याने, अशा ग्राहकांना घराचे वीजबिल शून्यावर आणण्याच्या उद्देशापर्यंत पोहोचता येणे सुलभ होणार आहे.
राज्य वीज नियामक आयोगाने पंचवार्षिक वीज दरवाढ प्रस्तावात घरगुती सौर ऊर्जा ग्राहकांना महावितरणच्या नव्या टीओडी मीटर प्रणालीनुसार वीजबिल आकारण्यात येणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या उद्देशानुसार घरगुती सौर ऊर्जा ग्राहकांचे वीजबिल शून्यावर येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे वेलणकर यांनी सांगितले.
‘महावितरणने घरगुती ग्राहकाला टीओडी पद्धतीप्रमाणे वीजबिल आकारू नये, अशी मागणी विविध ग्राहक संघटनांनी केली होती. आता आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे हा लढा यशस्वी झाला असून, घरगुती सौर ऊर्जा ग्राहकांना टीओडीपद्धत लागू होणार नाही, अशी स्पष्ट तरतूद राज्य वीज नियामक आयोगाने केली आहे,’ असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौर ऊर्जा पॅनेल बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यात दिवसभर सूर्यप्रकाशामुळे तयार झालेल्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून तयार झालेल्या विजेइतके युनिट ग्राहकाला आता त्याच्या गरजेच्या काळात कधीही वापरता येतील. सौरऊर्जेद्वारे तयार झालेले वीज युनिट वजा जाऊन, त्यापेक्षा अधिक युनिट वापरले गेले असतील, तर केवळ तेवढ्या अधिकच्या युनिटचे वीजबिल ग्राहकाला आकारण्यात येईल. तसेच, ग्राहकाने सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार झालेल्या विजेपेक्षा कमी वीज वापरली, तर अर्थातच ग्राहकाला शून्य वीजबिल तर येईलच, शिवाय उरलेले युनिट महावितरण ग्राहकाकडून वर्षाखेरीस खरेदी करील, अशी मूळ संकल्पना आहे.
‘वीज दरवाढ प्रस्तावात मात्र महावितरणने घरगुती ग्राहकाला ‘ऑफ पीक पीरिअड’ अर्थात, केवळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीज वापरावरच सौरऊर्जेतून तयार झालेले वीज युनिट वापरायची सवलत प्रस्तावित केली होती. मात्र, घरगुती ग्राहकांचा वीजवापर प्रामुख्याने संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत अधिक असतो. त्यामुळे या प्रस्तावित तरतुदीचा प्रत्यक्ष फायदा मिळणार नव्हता. परिणामी, सौर ऊर्जा पॅनेल बसवलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्यावर येण्याचे स्वप्न भंग होऊन पंतप्रधान सूर्यघर योजनेला मिळणारा प्रतिसाद कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता ती राहणार नसून, ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे तयार झालेले वीज युनिट कोणत्याही वेळी वापरता येतील,’ असे वेलणकर यांनी नमूद केले.