शतक पार केलेली महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पन्नाशी पार केलेले अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या दोन्ही साहित्य संस्था एकविसाव्या शतकातील माहिती तंत्रज्ञान क्रांतीपासून दूरच आहेत. वर्षभरानंतरही साहित्य महामंडळाच्या संकेतस्थळावर अजून जुन्याच पदाधिकाऱ्यांची नोंद आहे. तर, साहित्य परिषदेचे संकेतस्थळ अद्ययावत झालेले नाही.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले नाही. मुंबई मराठी साहित्य संघाच्या संकेतस्थळावरच साहित्य महामंडळासाठी एक पान देण्यात आले आहे. त्यामध्ये साहित्य महामंडळाचा स्थापनेपासूनचा इतिहास देण्यात आला असून दर तीन वर्षांनी महामंडळाचे कार्यालय घटक संस्थेकडे जाते याची आवर्जून नोंद करण्यात आली आहे. महामंडळाच्या घटनेनुसार गेल्या वर्षी एक एप्रिलपासून साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. त्यामुळे परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन हे साहित्य महामंडळाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. संकेतस्थळावरील साहित्य महामंडळाच्या स्वतंत्र पानावर महामंडळाचे कार्यालय पुण्यामध्ये असल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, त्यावर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून प्रा. उषा तांबे, प्रमुख कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे आणि कोशाध्यक्ष गुरुनाथ दळवी या मुंबई मराठी साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांचीच नोंद आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संग्रहातील तीन हजार ग्रंथांपैकी दुर्मिळ अशा तीनशे ग्रंथांचे डिजिटलायझेशन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प परिषदेने हाती घेतला असून त्यासाठी सरकार आणि उद्योग जगताकडून अर्थसाह्य़ घेण्यात येणार आहे. मात्र, परिषदेचे संकेतस्थळ अद्यापही अद्ययावत करण्यात आलेले नाही. ‘गुगल’वरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ‘विकीपिडीया’वर असलेली संक्षिप्त माहिती आणि म. श्री. दीक्षित यांचे पुस्तक यासंदर्भातील अल्पशी माहिती मिळते. मात्र, संकेतस्थळ अद्ययावत झालेले नसल्यामुळे परिषदेच्या कार्याची व्यापी एका क्लिकवर जाणून घेता येत नाही.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे स्वतंत्र संकेतस्थळ नसल्याचे महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी मान्य केले. संकेतस्थळ स्वतंत्रपणे विकसित करण्याबरोबरच ते अद्ययावत करण्यासंबंधीची पावले लवकरच उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले. तर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचेही संकेतस्थळ एक मेपूर्वी अद्ययावत करण्यात येणार असल्याचे परिषदेच्या कार्याध्यक्षा या नात्याने त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा