नाकी डोळी छान रंग गोरा गोरापान.. त्यात आलं तरुण पण मिरवायला.. कोणी तरी न्याहो मला फिरवायला….. या लावणीवर अनेक नृत्यांगनांनी यात्रा-जत्रांमध्ये आपली कला सादर करून, रसिक प्रेक्षकांकडून दाद मिळवली आहे. पण मागील चार महिन्यांपासून करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावणी कला केंद्र बंद असल्याने, असंख्य नृत्यांगनांवर बिकट परिस्थिती ओढवल्याचे दिसत आहे. अनेकजणांना घर चालवणेही अवघड झाले आहे. परिणामी अनेकजणी हाताला मिळेल ते काम करताना दिसत आहेत.
चौफुला येथील न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्रातील नृत्यांगना वैशाली माणेगावकर, मागील दहा वर्षांपासून आपल्या नृत्य कलेच्या जोरावर रसिकांची मनं जिंकत आलेल्या आहेत. मात्र करोना महामारीमुळे आज त्यांच्यावर घर चालवण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात काम करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधी बोलताना सांगतिले.
वैशाली माणेगावकर म्हणाल्या की, मी सर्व सामान्य कुटुंबातील असून अगदी लहानपासून मला नृत्याची आवड होती. त्यामुळेच मी या क्षेत्रात आली, यातून मिळणार्या पैशातून माझं घर चालतं. पण आता मागील चार महिन्यांपासून कला केंद्र बंद असल्याने, मी गावी आली आहे. गावी आल्यावर काम करायचं म्हटलं, तरी कोणी लवकर कामही देत नव्हतं. अखेर शेतात जाऊन काम करायच ठरवलं. या कामातून मिळणार्या पैशातूनच माझं घर कसबसं चालत आहे. मात्र कुटुंबात दहा सदस्य असल्याने घर चालवण्यात अडचणी येत आहेत.
तसेच, माझ्याकडे असलेल्या कलेच्या जोरावर आजवर अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. रसिक प्रेक्षकांच्या आशिर्वादामुळेच या क्षेत्रात काम करू शकले असेही त्यांनी बोलून दाखवले. आम्ही कठिण परिस्थितीतून जात असून राज्य सरकारने आमच्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात तरी आर्थिक मदत करावी, अशी मागणी करताना त्यांच कंठ दाटून आला होता. तर आता आम्ही कसं जगायच? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.