पुण्यातील गणेशोत्सव आणि महाराष्ट्राच्या मर्दानी खेळांची नेहमीच जगाला भुरळ पडली आहे. पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीतही हे मर्दानी खेळ पाहायला मिळतात. महिला आणि तरुणीदेखील या खेळांमध्ये हिरिरीने सहभागी होतात. दरम्यान, यंदा या मिरवणुकीत एक परदेशी महिलादेखील मर्दानी खेळ खेळताना दिसली. अॅना मारा असं या तरुणीचं नाव असून ती काही दिवसांपासून पुण्यात आहे. खास शिवकालीन मर्दानी खेळ शिकण्यासाठी ती आणि तिची मैत्रीण बेली गंधार पुण्यात आल्या आहेत. बेली ही मूळची स्पेनची तर अॅना इटालियन आहे.
बेली आणि अॅना या दोन्ही परदेशी तरुणींनी पुण्यात श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्यात या खेळाचं प्रशिक्षण घेतलं. यापैकी अॅनाने गुरुवारी (२८ सप्टेंबर) पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत आपलं कौशल्य दाखवत पुणेकरांची मनं जिंकली.
हे ह वाचा >> गणपती बाप्पांकडे काय मागितलंत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
बेली आणि अॅना या दोघींनी शिवाजीराजे मर्दानी आखाड्याच्या इन्स्टाग्राम पेजवर मर्दानी खेळाचे व्हिडीओ पाहिले. लहान मुली आणि तरुणी सफाईदारपणे मर्दानी खेळ खेळत असल्याचे व्हिडीओ पाहून बेली आणि अॅनाला या खेळाची भुरळ पडली. लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजीचे व्हिडीओ पाहून त्यांनाही हा खेळ शिकण्याची इच्छा झाली. त्यानंतर लगोलग दोघींनी पुणे गाठलं. पुण्यात येऊन दोघींनी शिवकालीन मर्दानी खेळ शिकून घेतले. तसेच कालच्या मिरवणुकीत या खेळांची प्रात्यक्षिकं सादर केली.