इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांना जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असल्याची टीका साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी भोसरीत बोलताना केली. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी व्यक्त केलेले मत व्यक्तिगत असून तो त्यांचा अधिकार आहे, अशी टिपणी करतानाच अतिसभ्यतेची कास धरल्याने मराठी साहित्य मागे राहिल्याचे ज्येष्ठ साहित्यकार गिरीश कर्नाड यांचे मत आपल्याला पटले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त लायन्स क्लब इंटरनॅशनल व डॉ. अनुज डायबेटिज सेंटर आयोजित कार्यक्रमासाठी शिंदे भोसरीत आले होते, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. २०१४ च्या निवडणुकानंतर देशात फॅसिस्ट विचाराचे सरकार आल्यास देशापुढे व समाजापुढे मोठा धोका असल्याचे मत मोरे यांनी व्यक्त केल्यानंतर त्यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, यासंदर्भात, शिंदे म्हणाले, सदानंद मोरे यांना धमकी देणे हा सांस्कृतिक दहशतवादाचा प्रकार असून त्यामागचे कारण शोधले पाहिजे. वर्षांनुवर्षे असा सांस्कृतिक दहशतवाद आपल्याकडे होतच आला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नरेंद्र दाभोलकरांची हत्या असो की मोरे यांना धमकीची घटना, हे पाहता समाजाची नैतिकता तपासावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते. चांगले, प्रबोधनाचे तसेच जनजागृतीचे काम करणारे जर समाजाला नको असतील तर जगण्याची, पाहण्याची दृष्टी तपासून घ्यावी लागेल. समाजात नेहमी दुहेरी नैतिकता दिसून येते. संविधानाच्या विरोधात अनेक घटना घडतात. धर्म, जातीसह वेगवेगळे भेद असतात. ते घेऊन माणूस जगत असतो. भेदांमध्ये संघर्ष निर्माण होतो, तेथे माणुसकीचा विचार पराभूत होतो. तसे होता कामा नये. मोदी यांच्याविषयी व्यक्त केलेले लता मंगेशकर यांचे वैयक्तिक मत आहे. कोणाला काय वाटते, कुणी काय बोलावे, हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्याविषयी घेतलेली भूमिका चुकीची आहे, असा प्रकार कोणीही करू नये. कर्नाड हे उत्तम बोलणारे, ज्येष्ठ साहित्यकार आहेत. त्यांच्याविषयी आदरभाव आहे. मात्र, अतिसभ्यता व साहित्याचा त्यांचा मुद्दा पटलेला नाही. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईविषयी कोणतेही भाष्य करण्याचे शिंदे यांनी टाळले. तो माझा प्रांत नाही, असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा