पुणे: पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचवेळी केवळ वेळ घालवण्यासाठी मेट्रो स्थानकात येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अनेक जण तिकीट काढून स्थानकात गेल्यानंतर आतमध्ये निवांत बसतात. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची विनाकारण गैरसोय होते. यावर उपाय म्हणून महामेट्रोने आता प्रवाशांसाठी तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर २० मिनिटांत प्रवास सुरू करणे बंधनकारक करण्याचे पाऊल उचलले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे मेट्रोची सेवा सध्या वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय या दोन मार्गावर सुरू आहे. सध्या मेट्रोने दररोज सुमारे ६० ते ६५ हजार प्रवासी प्रवास करतात. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. याचवेळी मेट्रो स्थानकात वेळ घालवण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मागील काही दिवसांत वाढली आहे. अनेक जण तिकीट काढून स्थानकात प्रवेश करतात मात्र, प्रवास सुरू करीत नाहीत. ते एकमेकांशी गप्पा मारत बसतात. याचवेळी काही जण स्थानकाच्या आवारात बैठका घेत असल्याचे प्रकारही समोर आले होते.

हेही वाचा… धक्कादायक! ‘लेझर बीम’मुळे पुण्यात १५ जणांच्या डोळ्यांना इजा, पुण्यातील विविध रुग्णालयांत नोंद; कायमस्वरुपी दृष्टी जाण्याचा धोका

स्थानकात वेळ घालवण्यासाठी जमलेल्या या प्रवाशांचा त्रास इतर दैनंदिन प्रवाशांना होऊ लागला आहे. कारण स्थानकात कायम गर्दी होताना दिसते. यावर उपाय म्हणून महामेट्रोने तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर २० मिनिटांत प्रवास सुरू करण्याचा नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. याचबरोबर तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर प्रवास संपवून प्रवाशाने ९० मिनिटांत बाहेर पडणे आवश्यक आहे. या नियमाचीही महामेट्रोने अंमलबजावणी सुरू केली आहे.

आता मेट्रोने प्रवास करताना…

  • तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर २० मिनिटांत प्रवास सुरू करा.
  • प्रवास सुरू केल्यानंतर तो संपवून ९० मिनिटांत मेट्रो स्थानकातून बाहेर पडा.

मेट्रोने प्रवास करताना प्रवाशांनी स्थानकात विनाकारण रेंगाळत बसू नये. त्यामुळे स्थानकात गर्दी होऊन त्याचा इतर प्रवाशांना त्रास होत आहे. यावर उपाय म्हणून महामेट्रोने प्रवासाच्या वेळेच्या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील इतर मेट्रोमध्येही असाच नियम आहे. – हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Its mandatory for passengers to start their journey on the pune metro within 20 minutes of entering the station after getting the ticket pune print news stj 05 dvr
Show comments