अवकाश संशोधन क्षेत्रात सातत्याने प्रगती होत आहे. प्रगत राष्ट्रांकडून सोडण्यात येणाऱ्या अवकाशयानामध्ये दीडशे टन वजन घेऊन जाण्याची क्षमता आहे. तर, भारतीय अवकाशयानाची क्षमता केवळ दीड टन वजन नेण्याचीच आहे. त्यामुळे अवकाशयानाची क्षमता कशी वाढविता येईल यादृष्टीने संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे मत, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
अनुबंध प्रकाशनतर्फे डॉ. प्रकाश तुपे यांच्या ‘स्पुटनिक ते चांद्रयान’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले; त्या प्रसंगी डॉ. गोवारीकर बोलत होते. माजी आमदार उल्हास पवार आणि प्रकाशक अनिल कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
डॉ. गोवारीकर म्हणाले, रशिया या कम्युनिस्ट राष्ट्राने अवकाशामध्ये सोडलेले स्पुटनिक हे अवकाशयान ४ ऑक्टोबर १९५७ रोजी पडले, त्या घटनेचा मी साक्षीदार आहे. भांडवलशाही विरुद्ध साम्यवादी असा शीतयुद्धाचा हा कालखंड होता. भारतामध्ये अवकाश तंत्रज्ञान हा विषय अणुऊर्जा विभागात समाविष्ट होता. मात्र, विक्रम साराभाई यांच्या कालखंडामध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) ही स्वायत्त संस्था कार्यरत झाली.
डॉ. माशेलकर म्हणाले,‘‘बौद्धिक संपदा आणि उत्कृष्टता हे भारतीय अवकाश मोहिमांचे वैशिष्टय़ आहे. लखनौ येथील भारतीय विज्ञान परिषदेमध्ये डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी चांद्रयान मोहिमेची कल्पना मांडली होती. भारताचे पाय जमिनीवर असले तरी आकांक्षा गगनाला भिडणाऱ्या आहेत याचीच ती साक्ष होती. या पुस्तकामध्ये अवकाश मोहिमांतील अपघात आणि यशोगाथा अशा घटनांची रोमांचकारी माहिती ओघवत्या शैलीमध्ये समाविष्ट आहे.

Story img Loader