केवळ उदासी छटा आणि दु:ख व्यक्त करणाऱ्या गीतांमधील वाद्य एवढीच सारंगीची दुर्दैवाने ओळख आहे. पण, वास्तव तसे नाही. तर, रसिकांना शतपटीने सुरांचा आनंद देणारे हे वाद्य सारंगी नाही तर ‘सौ-रंगी’ आहे, असेच म्हणावेसे वाटते.. ही भावना आहे सारंगीला साथीच्या वाद्यापासून मुक्ती देत या वाद्याला शास्त्रीय संगीताच्या मैफलीमध्ये स्वतंत्र स्थान देण्यामध्ये योगदान देणारे ज्येष्ठ सारंगीवादक पं. रामनारायण यांची.
‘श्रुती’ संस्थेतर्फे संगीतामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या पं. रामनारायण यांना रविवारी (३ मार्च) यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे होणाऱ्या कार्यक्रमात ओ. पी. नय्यर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पुण्यात आलेल्या पं. रामनारायण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पं. रामनारायण म्हणाले, संगीताला सीमा नसते. त्याचप्रमाणे संगीत ही कोणत्याही देशाची मक्तेदारी नाही. तर, संगीत ही आध्यात्मिक स्वरूपाची जागतिक भाषा आहे. ही भाषाच मी आयुष्यभर अबोलपणे बोलतो आहे. उस्ताद अब्दुल करीम खाँ, उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद आमीर खाँ यांसारखे दिग्गज गायक हे सारंगीवादक होते. सारंगीवादक हा मनातून गात असतो. ४० तारा जुळवून घेणारा कलाकार हा सुरातच असतो. शास्त्रीय संगीताची अन्य कोणत्याही संगीताची तुलना होऊ शकत नाही. पण, आपल्या चित्रपट संगीतामध्येही शास्त्रीय संगीतावर आधारित उत्तम गीतांची निर्मिती झाली आहे. आता दुर्दैवाने तसे चित्रपट होत नाहीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम वापर करणारे संगीतकारही उरलेले नाहीत.
वादनामध्ये गायकाला साथसंगत करणे एवढेच माझे काम होते. आकाशवाणीसाठी वादन करायचो. पण, त्याच्या मिळणाऱ्या मानधनामध्ये गुजराण न झाल्यामुळे मला चित्रपट संगीत क्षेत्राकडे वळावे लागले. त्याचा एक फायदा झाला की चित्रपटसृष्टीला सारंगी या वाद्याची ओळख झाली. आजही मी विद्यार्थीच आहे. जे शिकण्यासाठी येतात त्यांना सारंगीवादन शिकविताना मीदेखील त्यांच्याकडून शिकत असतो. माझ्यापरीने जमेल तेवढे काम मी करतच आहे. पण, हे वाद्य भविष्यामध्येही रहावे असे वाटत असेल तर, सरकारने माझ्या उपक्रमाला सहकार्य करावे, एवढीच अपेक्षा आहे.
……..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा