पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी असलेल्या प्रतीक्षालयाला सध्या अक्षरश: धर्मशाळेचे स्वरूप आले आहे. प्रतीक्षालयात येणाऱ्या कुणाचीही नोंद केली जात नाही किंवा तिकिटांची तपासणीही केली जात नाही. त्यामुळे या प्रतीक्षालयात कुणीही यावे व थांबावे, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांच्या साहित्याच्या चोऱ्यांबरोबरच रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी स्थानकावर प्रतीक्षालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. गाडीला उशीर झाल्यास किंवा सकाळी लवकर सुटणारी गाडी पकडण्यासाठी रात्री येणाऱ्या प्रवाशांसाठी या प्रतीक्षालयाची मोठय़ा प्रमाणावर गरज असते. रेल्वेचे प्रतीक्षालय असल्याने सुरक्षिततेची हमी असल्याचे समजून अनेक प्रवासी या ठिकाणी थांबतात. मात्र, अनेकांना या प्रतीक्षालयाचा वाईट अनुभव आल्याचे दिसून येत आहे. या प्रतीक्षालयातून अनेक वेळा प्रवाशांचे साहित्य चोरीला जाण्याचे प्रकार होत असतात.
प्रतीक्षालयात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद होणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे या ठिकाणी थांबणाऱ्या प्रवाशांकडे तिकिटांचीही तपासणी झाली पाहिजे. त्यामुळे प्रवासी नसतानाही वेगळ्या उद्देशाने येणाऱ्या लोकांना आळा बसू शकतो. मात्र रेल्वेच्या प्रतीक्षालयात येणाऱ्या कोणाचीही नोंद होत नाही. त्याचप्रमाणे तेथे थांबणाऱ्यांच्या तिकिटांचीही तपासणी रेल्वे प्रशासनाकडून केली जात नाही.
एखादा चोरटा रद्दी वर्तमानपत्र भरलेली प्लास्टीची पिशवी घेऊन प्रतीक्षालयात प्रवासी असल्याचे भासवून येतो. रात्री संधी मिळताच ही पिशवी झोपलेल्या एखाद्या प्रवाशाजवळ ठेवून प्रवाशाची पिशवी लंपास करतो. असे प्रकार प्रतीक्षालयामध्ये वारंवार घडले आहेत. दुसऱ्या दिवशी प्लास्टीकची ही बेवारस पिशवी सापडल्यानंतर विविध शक्यता लक्षात घेऊन पोलिसांना धावपळ करावी लागते.
दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेता सध्या रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले, तरी प्रतीक्षालयातील स्थिती लक्षात घेता अव्यवस्थेमुळे कोणीही कोणत्याही वेळेला प्रतीक्षालयात जाऊ शकतो. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या एकूण सुरक्षिततेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याने वारंवार रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची कुचराई होऊ नये, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
प्रतीक्षालयात ‘सीसीटीव्ही’ही नाही
रेल्वेचे प्रतीक्षालय रेल्वे स्थानकावरील एक महत्त्वाचा भाग असून, त्या ठिकाणी नोंद किंवा तिकिटांची तपासणी होत नसतानाच तेथे सीसीटीव्ही कॅमेराही बसविण्यात आलेला नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी या कॅमेऱ्यांची गरज आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी चोरीची एखादी घटना घडल्यास त्याचा तपास करण्यासाठीही सीसीटीव्हीची मदत होऊ शकते.

Story img Loader