सोन्या-चांदीचे भाव गेल्या तीन दिवसांत कमालीचे उतरल्याने सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत अचानक उठाव आला असून, एरवी पाडव्यानंतर ओसरणारी ही बाजारपेठ आता फुलली आहे. मोठय़ा किमतीमुळे दुर्लक्ष झालेल्या चांदीचा दर आता किलोमागे सुमारे सहा हजारांनी उतरल्याने एकदम उजेडात आली आहे. त्यामुळे पुण्यात शुद्ध सोन्याला वाढता प्रतिसाद आहेच, शिवाय खरेदीत चांदीसुद्धा ‘भाव’ खाऊन गेली आहे.
सर्वसाधारणपणे गुंतवणुकीसाठी नागरिकांचा सोन्यावर अधिक विश्वास असला तरी गेल्या पाच दिवसांत चांदीच्या विटांनाही (चिप्स) उत्तम प्रतिसाद असल्याचे निरीक्षण रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका यांनी नोंदवले आहे. सोमवारी चांदीचा भाव आणखी उतरला आहे. मात्र सोमवारी बाजार बंद असल्याने चांदीची खरी उलाढाल मंगळवारपासूनच लक्षात येईल, असे रांका म्हणाले.    
गुढी पाडव्याला (११ एप्रिल) सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅममागे २९,४०० रुपये होता, तर चांदीचा भाव प्रतिकिलो ५३,३०० रुपये होता. त्यानंतर सोन्या-चांदीच्या भावांतही सातत्याने घट झाली. सोमवारी सोन्याचा भाव २६,६०० रुपये तर चांदीचा भाव ४७५०० रुपये होता. सोन्यात तब्बल २८०० रुपयांची तर चांदीत ५८०० रुपयांची घट झाल्याने गेल्या पाच दिवसांत सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उडय़ा पडत आहेत. असे असूनही येत्या काळात भाव अजून कमी होण्याच्या आशेने काही ग्राहकांची मात्र खरेदी करण्यापूर्वी चलबिचल होताना दिसत आहे.
‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’ चे अजित गाडगीळ म्हणाले, ‘‘रविवारी पुण्यासह इतर जिल्ह्य़ांतील सराफी दुकानांतही ग्राहकांचा तुडुंब प्रतिसाद मिळाला. सोमवारी पुण्यातील दुकाने बंद होती. मात्र या दिवशीही सातारा आणि नाशिक येथे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. येत्या काळात ग्राहकांचा ओघ असाच राहील का हे सांगता येणे कठीण आहे मात्र सोन्या-चांदीच्या उतरलेल्या किमतीचा फायदा ग्राहक मोठय़ा प्रमाणावर गुंतवणुकीसाठी करून घेत आहेत.’’
—चौकट—
पुढे येणाऱ्या लग्नसराईसाठी आधीच तजवीज करून ठेवायच्या उद्देशाने तसेच गुंतवणुकीसाठीही शुद्ध सोन्याला सर्वाधिक मागणी असल्याचे रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या सुमारास शाळांना सुटय़ा लागतात. तसेच परगावी जायचे बेतही आखले जातात. त्यामुळे दरवर्षी या काही दिवसांत सोन्या-चांदीची उलाढाल मंदावत असल्याचे निरीक्षण रांका यांनी नोंदवले. गेल्या अनेक वर्षांनंतर या वर्षी प्रथमच सोन्या-चांदीचे भाव इतके उतरल्याने ग्राहक गुढीपाडव्यानंतर खरेदीसाठी सरसावले आहेत.