उन्हाळा ऐन मध्यावर असताना अचानक वाऱ्यांची दिशा फिरल्याने राज्याच्या बहुतांश भागात गारवा निर्माण झाला असून, चाळिशी ओलांडणारे तापमान अनेक ठिकाणी पस्तीस ते चाळीस अंशांच्या दरम्यान रेंगाळत आहे. हे वातावरण येत्या शनिवापर्यंत कायम राहील व त्यानंतर हळूहळू तापमान वाढून उन्हाळ्याचे चटके बसतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात एप्रिलच्या मध्यावर उन्हाळा चांगलाच टिपेवर असतो. बहुतांश भागात तापमान ४० अंशांच्या पुढे गेलेले असते, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी ते ४३ अंशांच्या पुढे असते. आठवडय़ापूर्वी तापमान वाढण्यास सुरुवात झाली, विदर्भात त्याने ४३ अंशांचा टप्पासुद्दा ओलांडला. मात्र, त्यानंतर गेल्या तीन-चार दिवसांत वाऱ्यांची लहर फिरली आणि सर्वच भागात गारव्यात वाढ झाली. पुण्यात गुरुवारी दुपारी सरासरीपेक्षा तीन अंश कमी म्हणजे ३४.७ अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले. नाशिक येथे तर ते ३२.७ अंश होते. याशिवाय कोल्हापूर (३४.५), सातारा (३६.२), सोलापूर (३८.५), औरंगाबाद (३७) येथेही त्यात घट झाली. विदर्भातही वाशिम (३९), गोंदिया (३९.३), यवतमाळ (३९) येथे पारा चाळीस अंशांच्या खाली उतरला. मुंबईत तापमानात फारशी घट झाली नसली तरी पश्चिमेकडून वेगवान वारे वाहत असल्याने हवेत गारवा जाणवत होता. अशीच स्थिती कोकणातील बहुतांस ठिकाणी होती.
पुणे वेधशाळेतील अधिकारी एस. बी. गावकर यांच्या माहितीनुसार, सध्या पश्चिमेकडून वारे येत असल्याने ही स्थिती आहे, ती शनिवापर्यंत कायम राहील. या स्थितीचा मान्सूनच्या कामगिरीशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याचा गारठा कशामुळे?
सध्याच्या गारठय़ाला चार घटक कारणीभूत आहेत.
१. सध्या उत्तरेकडून किंवा वायव्य (उत्तर-पश्चिम) दिशेकडून उष्ण वारे येत नाहीत.
२. त्याऐवजी पश्चिम दिशेकडून वारे येत आहेत, त्यांचा वेग अधिक आहे.
३. उकाडा वाढण्यास कारणीभूत ठरणारी वाऱ्यांची ‘अँटीसायक्लॉन स्थिती’ अरबी समुद्रात नेहमीपेक्षा दूर अंतरावर आहे.
४. बंगालच्या उपसागरात सध्या ‘अँटीसायक्लॉन स्थिती’ चा अभाव आहे.