पुणे : देशात बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत कृत्रिम गर्भधारणेकडे ओढा वाढू लागला आहे. जगभरात आतापर्यंत एक कोटीहून अधिक मुलांचा जन्म आयव्हीएफच्या माध्यमातून झाला आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया आणखी सोपी होऊन ती यशस्वी होण्याचा दर वाढला आहे.
देशात जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या चिंताजनक स्वरूप धारण करीत आहे. यामागे बदलती जीवनशैली, प्रदूषण, ताण, उशिरा लग्न आणि जास्त वयामध्ये गर्भधारणेचा प्रयत्न ही कारणे आहेत. याचबरोबर काही वैद्यकीय गुंतागुंतीमुळे महिला माता अथवा पुरुष पिता बनू शकत नाहीत. अशा वेळी कृत्रिम गर्भधारणा हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो. आता तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि अचूक बनली आहे.
हेही वाचा…पुणे : पावसामुळे आरटीओच्या कामकाजावर पाणी! जाणून घ्या लायसन्ससह इतर चाचण्यांचे बदललेले वेळापत्रक…
याबाबत आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलमधील आयव्हीएफतज्ज्ञ डॉ. अमित पाटील म्हणाले, की आयव्हीएफचा स्वीकार दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात एक कोटीहून अधिक मुलांचा जन्म आयव्हीएफद्वारे झाला आहे. आयव्हीएफमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. असिस्टेड हॅचिंग, एम्ब्रियोस्कोप, गॅमेटिस अक्टिव्हेशन, मायक्रोफ्लुईड्स, पूर्वजनुकीय तपासणी आदी नवीन गोष्टींचा समावेश या प्रक्रियेत झाला आहे. ही प्रक्रिया जास्तीत जास्त रुग्णांना परडवणारी व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मूल नसलेल्या जोडप्यांच्या आय़ुष्यात आनंद निर्माण करता येईल.
ओॲसिस फर्टिलिटीतील आयव्हीएफतज्ज्ञ डॉ. नीलेश बालकवडे म्हणाले, की वंध्यत्वावरील उपचारावर आयव्हीएफमुळे आमूलाग्र बदल घडला आहे. असंख्य जोडप्यांच्या आयुष्यात या प्रक्रियेमुळे आशेचा किरण निर्माण होत आहे. या प्रक्रियेतील तंत्रज्ञानात सुधारणा झाल्याने रुग्णांसाठी ही प्रक्रिया अधिक सोईची ठरत आहे. याचबरोबर ती यशस्वी होण्याचा दरही सातत्याने वाढत आहे. समाजात आयव्हीएफ उपचार केंद्रे मोठे योगदान देत आहेत. वंध्यत्वाची समस्या असलेल्या जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळवून देण्याचे काम ही केंद्रे करीत आहेत.
हेही वाचा…शहरबात : पिता-पुत्र जोडीची सायकलवरून पंढरीची वारी
जागतिक आयव्हीएफ दिन
जगभरात २५ जुलैला जागतिक आयव्हीएफ दिन साजरा केला जातो. आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे २५ जुलै १९७८ रोजी पहिल्या बाळाचा जन्म झाला होता. त्याचे नाव लुईस ब्राऊन होते. डॉ. रॉबर्ट एडवर्ड्स, डॉ. पॅट्रिक स्टेप्टो आणि ज्यॉ पर्डी यांच्या प्रयत्नातून ब्रिटनमधील बोर्नहॉल क्लिनिकमध्ये ही प्रक्रिया पहिल्यांदा झाली. त्या निमित्त दर वर्षी जागतिक आयव्हीएफ दिन साजरा केला जातो.