पिंपरी : मंत्रालयात कलाकारांच्या नस्ती (फाइल) महिनो-महिने प्रलंबित राहत असल्याबाबत शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल यांनी नाराजी व्यक्त केली. त्याला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील दुजोरा दिला. या बाबत आपण सभागृहात वारंवार बोलल्याचे त्यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मंत्रालयात कोणतीही फाईल वेगाने जात नाही. फायलीची सर्वसाधारण प्रसूती होत नाही, त्यासाठी सिझेरियन करावेच लागते. ज्याला फाईल वेगाने पळविता, येते त्यालाच काम जमते. रसिकांनी स्वतःच्या पैशातून तिकीट काढून नाटक पहावे, नाट्यगृहाची भाडेवाढ करण्याची मागणी कलाकारांनी करावी एवढे रसिक वाढावेत. नाटक क्षेत्रात बदल व्हावा. अमृत महोत्सवी वर्षात राज्यात ७५ नाट्यगृह उभारणार आहोत. तो संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत.
हेही वाचा >>>संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल ‘आयएएस’ अधिकाऱ्यांवर संतापले म्हणाले, आमचे भांडण मंत्रालयाशी..
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या नाट्यगृहात आधुनिकता आणली जाणार आहे. आम्ही नाटके करतो त्यापेक्षा कलाकार त्यांच्या क्षेत्रात जास्त राजकारण करतात. नाटक पाहतानाच मिळणारा आनंद खरी श्रीमंती आहे, कितीही खर्च करून हे सुख मिळत नाही. नाटकात भविष्याचा वेध घेतला जातो. नाटक फक्त मनोरंजन करत नाही, तर दिशा देते. सरकार नाट्य क्षेत्राच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.