नंदेश उमप यांचा चैत्रबन पुरस्काराने सन्मान
गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांना चैत्रबन पुरस्कार तर, युवा गायिका आर्या आंबेकर हिला विद्या प्राज्ञ पुरस्कार जाहीर झाला आहे.
[jwplayer OnydZc5l]
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १४ डिसेंबर रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात माजी संमेलनाध्यक्ष आणि ‘आविष्कार’ संस्थेचे प्रमुख अरुण काकडे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे नंदेश उमप यांना प्रदान करण्यात येणाऱ्या चैत्रबन पुरस्काराचे आणि आर्या आंबेकर हिला प्रदान करण्यात येणाऱ्या विद्या प्राज्ञ पुरस्काराचे स्वरूप आहे. वीणा तांबे यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई यांच्या स्मरणार्थ गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उदगीर येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा कांकरे हिला अडीच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेला गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त श्रीधर मागडूळकर आणि आनंद माडगूळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर गदिमा गीतातील विविध रसांचे आविष्करण करणारा ‘नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी’ हा कार्यक्रम स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. उल्हास बापट आणि विनया बापट यांची असल्याचे प्रा. प्रकाश भोंडे यांनी सांगितले.
[jwplayer izOWW4O7]