बॉलिवूडचे भिडू जेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ हे त्यांच्या स्वभावामुळे आणि अनोख्या स्टाईलमुळे ओळखले जातात. त्यांच्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस ते आवर्जून करत असतात. मावळ चांदखेड येथे श्रॉफ यांचं फार्म हाऊस आहे. तिथं काम करणाऱ्या तरुणाच्या वडिलांचं नुकतच निधन झालं, त्याच्या कुटुंबाच सांत्वन करायला ते विसरले नाहीत. जॉकी श्रॉफ यांनी घरी जाऊन गायकवाड कुटुंबाची भेट घेतली, जमिनीवर बसून कुटुंबासोबत त्यांनी गप्पा मारल्या.
जॅकी श्रॉफ यांचं मावळ चांदखेड येथे फार्म हाऊस आहे. तिथे सागर दिलीप गायकवाड नावाचा तरुण काम करतो. त्याच्या वडीलांच अल्पशा आजाराने नुकतंच निधन झालं. याची माहिती अभिनेते जॅकी श्रॉफ यांना मिळताच त्यांनी थेट सागरचं घर गाठून त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. जॅकी यांनी जमिनीवर बसून आपुलकीने गायकवाड कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीसोबत गप्पा मारल्या. लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वांची विचारपूस केली.
जॅकी श्रॉफ यांच्या भेटीमुळे गायकवाड कुटुंबीय भारावून गेले. जॅकी श्रॉफ हे नेहमीच अत्यंत वेगळे कलाकार म्हणून गणले गेले आहेत, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरखीत झालं आहे.