राहुल खळदकर

पावसामुळे गुऱ्हाळे बंद; सांगली, कोल्हापुरातील अतिवृष्टीचा परिणाम

सांगली-कोल्हापुरातील अतिवृष्टी आणि पुणे जिल्ह्य़ात पाऊस सुरू असल्याने गुऱ्हाळे बंद आहेत. परिणामी गुळाची आवक घटत असून पुरवठय़ातील घट आणि मागणीतील वाढ यामुळे ऐन दिवाळीत गूळ महागला आहे.

ऑगस्टमध्ये सांगली-कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील गूळ उत्पादकांची गुऱ्हाळे जवळपास १५ ते २० दिवस बंद होती. सांगली-कोल्हापूर भागाबरोबर पुणे जिल्ह्य़ातील दौंड तालुक्यात असलेल्या पाटस, केडगाव, नांदगाव, यवत भागात मोठय़ा प्रमाणावर गुऱ्हाळे आहेत. या भागांतही काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे या भागातील गुऱ्हाळे बंद ठेवावी लागली.

गेल्या एक ते दीड महिन्यापासून ऐन सणासुदीच्या काळात गुळाची आवक कमी होत चालली असून मागणीच्या तुलनेत पुरवठाअपुरा असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.

गुळाच्या दरात प्रतवारीनुसार क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात महिनाभरापूर्वी दर्जानुसार गुळाचे प्रति किलोचे दर ३६ ते ४४ रुपये असे होते. सध्या किरकोळ बाजारात प्रति किलो गुळाचा दर ४० ते ५० रुपये आहे.

रसायनमुक्त गुळाला मागणी

काही वर्षांपासून रसायनविरहित गुळाच्या मागणीत वाढ झाली आहे. या गुळाच्या निर्मितीत रसायनांचा वापर केला जात नाही. लाल, केशरी रंगाचा रसायनविरहित गूळ चविष्ट असतो. सध्या बाजारात गुळाच्या चार हजार ढेपा आणि दोन हजार बॉक्सची आवक होत आहे.

घाऊक बाजारात गुळाचे दर दर्जानुसार (प्रति क्विंटल रुपये)

क्रमांक १- ३८०० ते ३९००

क्रमांक २- ३६०० ते ३७५०

क्रमांक ३- ३१०० ते ३५००

उच्च प्रतीचा गूळ (एक्स्ट्रॉ) – ४००० ते ४१००

रसायनमुक्त गूळ (बॉक्स पॅकिंग) – ३७०० ते ४६००.

Story img Loader