परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या प्राध्यापकांना राज्यातील काही विद्यापीठांनी कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत, अशी माहिती प्राध्यापकांच्या ‘एमफुक्टो’ या संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी गुरूवारी दिली. प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये शिकवण्याचे काम करत असताना आमच्यावर कारवाई कशी होऊ शकते, असा सवाल प्राध्यापक संघटनेने विचारला आहे. राज्यभरातील प्राध्यापकांचे शुक्रवारी जेलभरो आंदोलनही होणार आहे.
प्राध्यापकांनी बहिष्कार मागे न घेतल्यास त्यांच्यावर ‘एस्मा’नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानंतर ‘आम्ही आमचे महाविद्यालयांमध्ये शिकवण्याचे काम करत आहोत, तर आमच्यावर कारवाई कशी करणार?’ असाच उलट सवाल आता प्राध्यापक संघटनेकडून केला जात आहे. प्राध्यापकांच्या एमफुक्टो या संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील विद्यापीठांच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. प्राध्यापक संघटनेच्या काही मागण्या मान्य करून प्राध्यापकांना बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन शासनाने केले. जे प्राध्यापक परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकतील त्यांच्यावर ‘एस्मा’ कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णयही शासनाने घेतला. राज्यातील काही विद्यापीठांनी प्राध्यापकांना ‘कारणे दाखवा’ नोटीसही पाठवल्या आहेत. मात्र प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये जात आहेत. शिकवण्याचे काम करत आहेत, असे असताना आमच्यावर एस्मानुसार कारवाई कशी करणार, असा सवाल प्राध्यापक संघटनेने केला आहे. एमफुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेचे अध्यक्ष शिवाजराव पाटील यांनी सांगितले, ‘‘नागपूर, मुंबई, या विद्यापीठांबरोबर राज्यातील बाकी काही विद्यापीठांनीही प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत. प्राध्यापकांनी या नोटिशीला उत्तरही पाठवले आहे. आम्ही संप केलेला नाही. असहकार पुकारला आहे. आमच्यावर एस्मानुसार कारवाई कशी होऊ शकते? आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. प्राध्यापकांना नियुक्तीच्या दिनांकापासून नेट-सेट मधून सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे आमचा बहिष्कार कायम राहणार आणि जेलभरो आंदोलनही होणार.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 
x