पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यासह कारागृहातील रक्षकासह समुपदेशकाला गुन्हे शाखेने अटक केली.ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते (वय ५७, रा. रक्षकनगर, खडकी) याच्यासह कारागृह रक्षक मोईस अहमद शेख (वय ३०, रा. मूळ रा. देगलूर, नांदेड), समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे (वय ४४) यांना मंगळवारी अटक करण्यात आली. इंगळे याला मंगळवारी रात्री उशीरा गुन्हे शाखेने अटक केली. शेवते आणि शेख यांना अटक करुन मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. ललित पाटील ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेत होता. २ ऑक्टोबर रोजी तो बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. त्यादिवशी कारागृह रक्षक शेख वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये बंदोबस्तात होता. शेखने ललितला पसार होण्यास मदत केल्याचे तपासात उघडकीस झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. शेवते ॲड. प्रज्ञा कांबळे, अभिषेक बलकवडे, विनय आरहाना यांच्या संपर्कात होता. शेख याचा मोबाइल संच वापरुन ललितने कांबळे, बलकवडे, आरहाना यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर तो ससून रूग्णालयातून पसार झाला. याप्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने पोलीस कोठ़डी देण्याची विनंती सरकारी वकील ॲड. मंजुश्री इथापे-यादव यांनी युक्तीवादात न्यायालयाकडे केली. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी शेवते आणि शेख यांना १ डिसेंबरपर्यंत पोलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेने कारागृहातील समुपदेशक इंगळे याला मंगळवारी रात्री अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली होती. ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते मध्यस्थ म्हणून काम करत असून, त्याने रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप धंगेकर यांनी नुकताच केला होता. गुन्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. त्यानंतर शेवतेसह कारागृह रक्षक शेखला गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललितसह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली असून, न्यायालयाने ललितसह साथीदारांना येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.