‘जयपूर-अत्रौली घराणे; काल, आज आणि उद्या’ या विषयावरील परिसंवाद गानसरस्वती महोत्सवाच्या निमित्ताने नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे ज्योत्स्ना भोळे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. डॉ. चैतन्य कुंटे यांनी सूत्रसंचालन करताना जयपूर अत्रौली घराण्यापेक्षा, ठरावीक कलाकारांच्या सादरीकरणापेक्षा गायनशैलीबद्दल चर्चा करणे, हा उद्देश असल्याचे नमूद केले. या गायकीची सुरुवातीची अवस्था म्हणजे उस्ताद अल्लादिया खाँ यांच्यापूर्वीचे स्वरूप, त्यांच्या तरुणपणातील गायन आणि त्यानंतर आजारपणात त्यांचा आवाज गेल्यानंतर त्यांनी बदललेल्या गायकीचे स्वरूप अशा तीन टप्प्यांमध्ये कसे बदलले, या प्रश्नाला उत्तर देताना विदुषी श्रुती सडोलीकर यांनी सांगितले की धृपद परंपरेमधला स्वरांचा ठेहेराव, तालाचा पक्केपणा यांचा अभ्यास खाँसाहेबांनी लहानपणी केल्यानंतर ख्यालगायकी वडील आणि काकांकडून शिकताना तानबाजी करण्याऐवजी ठेहेराव असलेली गायकी अंगीकारण्यावर भर दिला होता. रागाची प्रतिमा उभी करण्यासाठी गतीवर आरूढ होऊन तानबाजी करण्यापेक्षा रागाच्या शुद्धतेवर भर देण्याचे शिक्षण त्याना मिळाले होते. आजारपणाच्या काळात खाँसाहेबांनी चिंतन केले ज्यामधून वेगळी गायकी निर्माण झाली. हत्थन खाँसाहेब म्हणायचे, “भैया तुम्हारा गला जहाँ जाता है, वहाँ हमारी नजर नही जाती.” प्रस्तुती करण्यासाठी आपल्या गळ्याला कोणते राग योग्य आहेत, याचे चिंतन त्यांनी केले होते. बंदिशीच्या शब्दांचे वजन ओळखून आलाप, बोल, बोल-आलाप, बोल-ताना आणि ताना यांचा विचार करताना शुद्ध वर्णोच्चाराच्या साहाय्याने आकाराचे वजन सगळीकडे सारखे असावे याचा प्रयत्न केला. किमान अडीच सप्तकामध्ये आवाज फिरावा अशी त्यांची प्रतिज्ञा असायची. त्यांचे शिष्य भुर्जी खाँ आणि त्यांचे शिष्य वामनराव सोडोलीकर यांनी हेच तत्त्व पाळले.
उस्ताद अहमद खाँ, पालेकर, रत्नाकर पै या परंपरेमध्ये गायकी वेगळी आहे, हा मुद्दा मांडताना डॉ. मिलिंद मालशे यांनी सांगितले की ख्यालाच्या गायकीमध्ये उस्ताद अल्लादिया खाँ यांनी बदल केले. स्वरांचा ‘डबल टच’ हे खाँसाहेबांच्या गायकीचे वैशिष्ट्य होते पण रत्नाकर पै स्वरांवर थांबून गायचे. ठेहेराव असलेली गायकी ज्यामध्ये लय खेचून घेतलेली असायची. विदुषी डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांनी सांगितले की, कोणतीही बंदिश कोणत्याही लयीमध्ये, कोणत्याही तालात गाता यायला हवी आणि जो ताल गायला जातो त्याच्या खंडाप्रमाणे ‘खानापुरी’ झाली पाहिजे असे गुरू रत्नाकर पै यांनी शिकवले. खाँसाहेबांच्या पुढच्या पिढीच्या गायनाचे स्वरूप कसे होते आणि विदुषी किशोरी आमोणकरसारख्या कलाकारांमुळे या गायकीमध्ये काय बदल घडले, या प्रश्नावर ऊहापोह करताना विदुषी अश्विनीताई म्हणाल्या, प्रत्येक घराण्याची गायकी कालानुरूप, व्यक्तीनुरूप बदलली आहे. केसरबाई आणि मोगुबाई यांच्या गायकीमध्येही काही साम्यस्थळे आहेत आणि काही फरक आहेत. प्रत्येक कलाकाराचा पिंड वेगवेगळा असतो, त्याची आवड निवड वेगळी असते, त्याच्या आवाजाच्या अनुकूलता वेगळ्या असतात, त्याचे मन वेगळ्या प्रकारांमध्ये रमते. खाँसाहेबांची आलापिची गायकी होती, जी स्वरलगाव आणि स्वरांचे माहात्म्य सांगणारी गायकी होती, जी त्यांना आजारपणानंतर बदलावी लागली आणि स्वर-लय प्रधान गायकी झाली ती किशोरीताईंनी पुन्हा स्वरप्रधान केल्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले. मोगुबाई सिद्धहस्त लयकार होत्या तरीही किशोरीताई कधीही लयकारीमध्ये रमलेल्या दिसल्या नाहीत.
सुयोग कुंडलकर यांनी संवादिनी वादक या नात्याने पद्माताई शाळीग्राम, किशोरीताईंपासून अश्विनी भिडे-देशपांडे, रघुनंदन पणशीकर यांसारख्या अनेक कलाकारांना संगत केली आहे, कंठ संगीताचे शिक्षण घेतलेल्या सुयोग यांनी जयपूर अत्रौली घराण्यातील गायकीमधील बदल कसे घडले, काही कलाकारांनी इतर घराण्यांचे संगीत शिकल्यानंतर जयपूरच्या गायकीकडे वळले त्यांच्या गायकीमध्ये काय बदल जाणवतात या प्रश्नाला उतर देताना सांगितले की किशोरीताईंनी स्वराचा विचार स्वतःचा केला. अनेक घराण्यातील कलाकारांनी इतर घराण्यातल्या गायकीमध्ये काय बदल घडत आहेत, इतरत्र सांगीतिक बदल काय घडत आहेत, याचा विचार केला, पाठपुरावा केला म्हणूनच ते महान कलाकार गवय्ये झाले, निव्वळ विद्वान गायक नव्हे तर मैफिली गाजवणारे सिद्धहस्त कलाकार झाले. स्थुलातून सूक्ष्माकडे जाणे हा किशोरीताईंचा विचार होता. स्वराचा, शब्दाचा, लयीचा आणि रागत्वाचा अतिशय सूक्ष्म विचार करत राहिल्या आणि आपल्या गायनामध्ये मांडत राहिल्या हे किशोरीताईंचे मोठेपण होते. अनेक कलाकार असाच विचार केल्यामुळे महान झाले. यावर अश्विनीताई म्हणाल्या की अभ्यास करायचा म्हणून ते कलाकार असा विचार करत नसतात, त्यांचा पिंडच तसा असतो, ते नेहमीच स्वतःबद्दल असमाधानी असतात म्हणूनच ते महान कलाकार होतात आणि काळाच्या कसोटीवर टिकून राहतात.
पंडित रघुनंदन पणशीकर यांनी गुरू विदुषी किशोरी आमोणकर यांचा गायकीबद्दल विचार काय होता या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की किशोरीताईना ओळखू शकेल अशी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे, किशोरीताई. याचे कारण त्यांनी मांडलेला प्रत्येक भूप, यमन, शुद्ध नट वेगळा असायचा. त्यांच्या गायनामध्ये भावसौंदर्य होते, चिंतन असायचे, कालच्या मैफिलीपेक्षा वेगळा विचार आजच्या मैफिलीत असायचा. किशोरताईंनी स्वराला प्राधान्य दिले होते. दीड तासाच्या मैफिलीमध्ये त्या सव्वा तास आलापी करायच्या, दहा मिनिटे ताना गायच्या. नित्य नूतन असेच त्यांच्या गायकीचे वर्णन करता येईल. सुयोग कुंडलकर यांनी हाच मुद्दा पुढे घेऊन जाताना सांगितले की किशोरीताईंनी प्रचलित राग अनवट असल्यासारखे सादर केल्यामुळे प्रचलित रागाचे वेगळेच दर्शन श्रोत्यांना घडायचे. घराण्याची तालीम देताना काय फरक पडला आहे, या प्रश्नाला उत्तर देताना अश्विनीताईंनी नमूद केले की प्रत्येक गुरूला जशी तालीम मिळाली, तशी त्यांनी शिष्याना दिली आहे पण शिष्याची घेण्याची कुवतही गुरू लक्षात घेऊन त्यानुसार तालीम देतात. कोणताही गुरू एखादा राग शिष्याला देत नसतो, तर शिष्याने तो घ्यायचा असतो, हा मुद्दाही चर्चिला गेला.
सुयोग कुंडलकर यांनी एक मुद्दा उपस्थित केला की जोड राग शिकण्यापूर्वी ज्या रागांचा जोड केला आहे ते दोन राग न शिकता जोड राग आजच्या पिढीकडून शिकले वा मांडले जातात, हा नवीन प्रकार गायकीच्या दृष्टिकोनातून गैर असल्याचे नमूद करण्यात आले. डॉ. चैतन्य कुंटे यांनी सांगितले की ठरावीक राग आणि ठरावीक तालामध्ये मांडणी, असे घराण्याच्या गायकीचे संकुचित स्वरूप पुढे येत आहे, जे भविष्याचा विचार करता गैर आहे.
जयपूर गुणीजनखाना या माध्यमातून युवा गायिका राधिका जोशी यांनी जयपूरच्या गायकीचे दस्तऐवजीकरण करण्याच्या प्रयत्नाचे कौतुक डॉ. चैतन्य कुंटे यांनी केले. गुरुच्या तालमीला जोड देण्यासाठी परंपरेचे जतन करण्याचा उद्देश असल्याचे राधिका यांनी सांगितले. यासाठीच रागांच्या सादरीकरणाचे, बंदिशींचे ऑडियो-व्हिडियो रेकॉर्डिंग करून ते सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येत आहे आणि त्यासाठी दिग्गज कलाकार सहकार्य करीत आहेत हे सुद्धा राधिका यांनी आवर्जून नमूद केले.
युवा गायक आणि रघुनंदन पणशीकर यांचे शिष्य सौरभ काडगावकर यांनी बदलत्या काळातील मैफिलीतील गायनातील आव्हाने सांगितली. चाळीस मिनिटात एखादा राग सादर करणे, अटेन्शन स्पॅन कमी असणे, अनवट राग गायनानंतर एक परिचित राग आणि एक भजन गाणे, असे प्रकार करावे लागतात. चाळीस मिनिटांच्या सादरीकरणामध्ये तीस मिनिटे आलापी करता येत नाही, हे सुद्धा आव्हान आहे. जाणकार श्रोते कमी झाल्याचा मुद्दाही चर्चिला गेला. राधिका जोशी यांनी बदलत्या काळानुसार काही नवीन बंदिशी तयार केल्या जात असल्याचे आवर्जून सांगितले आणि त्याची झलक गायनामधून पेश केली. या परिसंवादाच्या निमित्ताने जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीचे भविष्य युवा पिढीकडे सुरक्षित असल्याचे आश्वासन देण्यात नवीन पिढी यशस्वी झाली, हे महत्त्वाचे.