जागतिक जलदिनानिमित्त प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या गणेशखिंड येथील प्राथमिक विद्या मंदिरच्या साडेपाचशे विद्यार्थ्यांनी जलदिंडी काढून पाण्याच्या बचतीचे महत्त्व नागरिकांना सांगितले. ‘थेंब, थेंब पाण्याचा, लाख, लाख मोलाचा’ ‘पाण्याची बचत, पैशांची बचत’ ‘अतिवापर पाण्याचा, इशारा हा धोक्याचा’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
शाळेच्या परिसरात फिरून ही िदडी विद्यापीठ चौकात आली. तेथे स्थानिक नगरसेवक राजेंद्र पवार यांनी दिंडीचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या हातात घोषणांचे रंगीत फलक होते तसेच पाणीबचतीसाठी विद्यार्थी व शिक्षक घोषणाही देत होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत व कौतुक केले. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या िदडीत सहभाग घेतला होता. मुख्याध्यापिका आशा सोनवणे यांनी या दिंडीचे आयोजन केले. पालक संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील तसेच अविनाश वाल्हेकर यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पाण्याच्या बचतीचा संस्कार या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर होत असून नागरिकांनाही या विषयाचे महत्त्व जलदिंडीमुळे लक्षात येत आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.
 

Story img Loader