मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली. गृह विभागाने सोमावारी सायंकाळी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले.
हेही वाचा >>> करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीचा अहवाल द्या; उच्च शिक्षण विभागाचा विद्यापीठांना आदेश
जालन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दोशी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दोशी यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची नागपूर येथे बदली करण्यात आली. अमरावतीतील उपायुक्त संभाजी कदम यांची पुणे पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पुणे लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली. लोहमार्ग पोलीस दलातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश शिंदे यांची अमरावती येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. माधुरी केदार यांची लोहमार्ग विभागाच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.