Pahalgam Terror Attack Updates Today: पुणे शहर आणि जिल्ह्यातून जम्मू-कश्मीरमध्ये विविध ठिकाणी एकूण २६४ पर्यटक फिरायला गेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाली आहे. या पर्यटकांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. जम्मू- काश्मिरमध्ये पुणे आणि जिल्ह्यातून काही पर्यटक स्वतंत्रपणे, तर काही सहल नियोजन करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले आहेत. त्यांची माहिती मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काल रात्रीच हेल्पलाइन सुरू करण्यात आली. या हेल्पलाइनवर आलेल्या दूरध्वनींनुसार, शहर आणि जिल्ह्यातील एकूण ३५४ पर्यटक गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे.
दरम्यान पुण्यातील एकूण पर्यटकांपैकी दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून, दोन महिला पर्यटक जखमी आहेत, असे जिल्हा प्रशासनाच्या यादीत नमूद आहे. उर्वरित सर्व पर्यटक सुखरूप असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यास जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांना पुण्यात आणण्यासाठीचेही नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विठ्ठल बनोटे यांनी दिली.
हेल्पलाइन क्रमांक : ०२०-२६१२३३७१, ९३७०९६००६१, ८९७५२३२९५५, ८८८८५६५३१७