लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुण्यात रविवारी (५ जानेवारी) जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे. यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित असणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निघृण हत्येचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी मागणी होत आहे. बीडमध्ये या मागणीसाठी सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्याच धर्तीवर अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने रविवारी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अशी माहिती अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी अनिकेत देशमाने यांनी दिली.
आणखी वाचा- धनकवडीत दहशत माजवून वाहनांची तोडफोड; टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल
असा असणार मोर्चा
रविवारी सकाळी १० वाजता लाल महाल येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून, कसबा पेठमार्गे दारुवाला पूल, अपोलो थिएटर चौक, केईएम हॉस्पिटलपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप होईल. मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी होणार असून, मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे, भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार सतेज बंटी पाटील, माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आणि इतर पक्षातील नेते, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती असणार आहे.