महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे सव्वाशे गावांमध्ये दुष्काळातील मदतीचे काम सुरू झाले असून गावांमध्ये पाणीपुरवठा करणे आणि पशुधन वाचविणे ही दोन कामे अग्रक्रमाने केली जात आहेत. पुढील काळात गरजेनुसार या कार्याची व्याप्ती वाढविण्याचीही योजना असल्याची माहिती समितीचे प्रांत कार्यवाह डॉ. अनंत कुलकर्णी यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रात नगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना आदी तेरा जिल्ह्य़ांमध्ये दुष्काळाची परिस्थिती भीषण असून तेथे जनकल्याण समितीने काम सुरू केले आहे. या कामाची माहिती मंगळवारी देण्यात आली. समितीचे शैलेंद्र बोरकर, चंदन कटारिया, वसंत फाटक आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ज्या गावांमध्ये शासकीय यंत्रणा पोहोचू शकत नाही वा जी गावे दुर्गम भागात आहेत, मुख्य रस्त्यांपासून अतिदूर आहेत, अशी गावे समितीने प्राधान्याने साहाय्यासाठी निवडली आहेत. या गावांमध्ये टँकरने शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, टँकरने पुरवलेले पाणी साठवून ठेवण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांचे वाटप करणे, चारा व पशुखाद्याचा पुरवठा, पारंपरिक विहिरी, बारव, नाले आदी जलस्रोतांची स्वच्छता आणि विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था अशा स्वरूपाची कामे सुरू करण्यात आल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
वाडय़ा-वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा व पशुधन वाचविणे ही कामे महत्त्वाची असून पशुधनासाठी चारा पुरवठा तसेच पशुखाद्याचा पुरवठाही समितीतर्फे मोठय़ा प्रमाणात केला जाणार आहे. शेतकऱ्यांना अवजारे, बियाणे वाटप ही कामेही समिती करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दुष्काळी भागासाठी साहाय्य करण्याचे समितीचे हे काम समाजाच्या मदतीवर चालणार असून त्यासाठीची माहिती देण्याची व्यवस्था समितीच्या कार्यालयात (दूरभाष: २४३२ ४०७१) करण्यात आली आहे.