दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आधार देण्यासाठी जनसेवा बँकेतर्फे पुरंदर तालुक्यातील एखतपूर-मुंजवडी गाव दत्तक घेण्यात आले असून गेल्या एक महिन्यापासून गावाला दररोज १२०० लीटरचा पाण्याचा टँकर पाठवण्यात येत आहे. याशिवाय, आणखी अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत.
बँकेचे अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे यांनी ही माहिती दिली. दुष्काळाच्या छायेत अनेक गावे होरपळत असल्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सासवडपासून नऊ किलोमीटरवरील १२०० लोकसंख्या असलेले हे गाव बँकेने दत्तक घेतले आहे. एक महिन्यापासून दररोज १२ हजार लीटरचा टँकर गावाला पाठवण्यात येत असून पावसाळा सुरू होईपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. नंतरही कायमस्वरूपी पाणी देण्याचा प्रयत्न राहणार आहे. याशिवाय, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमासह वृक्षलागवड आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अशाप्रकारे उपाययोजना करण्यावर भर देणार असून हे गाव आदर्श गाव होईल, यादृष्टीने प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.
नुकतेच गावात टँकरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अॅड. गोरडे यांच्यासह बाळासाहेब कचरे, डॉ. आशा बहिरट, अनुपमा कळसकर, हेमंत हरहरे, अप्पासाहेब पुरंदरे, शिवाजी भोसले, दत्ता झुरंगे, नंदकुमार दिवसे, अमोल बनकर, महादेव टिळेकर, मुरलीधर झुरंगे, विजय झुरंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.