लोकसत्ता वार्ताहर
लोणावळा : देशातील ७० टक्के जनतेने भाजपला नाकारले आहे. देशातील काही राज्ये वगळता इतर सर्वत्र भाजप विरहित सरकारे आहे. जेव्हा देशाचा विचार येतो तेव्हा देखील नागरिकांना प्रादेशिक पक्षांना महत्व दिले पाहिजे. कोण नेतृत्व करणार याची चिंता करू नका. इंदिरा गांधी शक्तीशाली असतानाही आणीबाणी लागू केल्यानंतर जनतेने त्यांना नाकारत जनता पक्षाच्या हातात देशाची सत्ता दिली. ते आताही होऊ शकते, असे सूचक संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिले.
देशातील नागरिक हुशार आहे. त्यांच्यासमोर योग्य वस्तुस्थिती मांडली गेली पाहिजे असे सांगून पवार यांनी ‘राजकारण केवळ सत्तेसाठी करायचे नसते समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देण्यासाठी करायचे असते’, अशी टिप्पणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर सेलच्या वतीने लोणावळ्यात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी शरद पवार बोलत होते.
आणखी वाचा-…मी डॉक्टर नसलो तरी मुन्नाभाई MBBS आहे – आमदार निलेश लंके
देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या अशांततेचा मुद्दा उपस्थित करत, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारऱ्या डॉक्टर सेलने याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पवार म्हणाले, देशात लोकांच्या,सरकारी अधिकार्यांच्या घरावर हल्ले होत आहेत. आम्ही देशाचे नागरिक आहोत की नाही असा प्रश्न संरक्षण खात्यातील एका निवृत्त अधिकार्याने मणीपूरमध्ये विचारला. अनेक अधिकारी व नागरिक हा प्रश्न उपस्थित करत आहेत. देशात निर्माण होत असलेली ही सामाजिक शांतता देशाच्या दृष्टीने घातक आहे. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप, आमदार नीलेश लंके, आमदार सुनील शेळके, नरेंद्र काळे, विजय जाधव, लोंढे, बसवराज पाटील या वेळी उपस्थित होते.