बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या मोबाइल सीमकार्डचा जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये वापर झाल्याचे उघड झाले असून, याबाबत दहशतवादविरोधी पथकाने दुसरा गुन्हा दाखल केला आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोघांना या गुन्ह्य़ात वर्ग करण्यात आले आहे. या दोघांना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले.
फिरोज ऊर्फ हमजा अब्दुल हमीद सय्यद (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, पुणे) व इरफान मुस्तफा लांडगे (वय ३०, रा. मुकुंदनगर, जि. नगर) यांना या प्रकरणात पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांद्वारे मिळविलेल्या टाटा डोकोमो व एअरसेल या कंपन्यांच्या सीमकार्डची विक्री केल्याप्रकरणी यापूर्वी गणपत दामोदर गर्ग (वय ४२, रा. आदर्शनगर दिघी) व इक्बाल सादिक खान (वय ३१, रा. कोंढवा) यांना अटक करण्यात आली होती.
गर्ग यांची दिघी येथे दोन दुकाने आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी डोकोमो कंपनीचे १४० सीमकार्ड व ७८ जणांची छायाचित्रे तसेच मतदानकार्ड जप्त केले आहे. दिल्ली पोलिसांनी फिरोज व इरफान यांच्याकडे केलेल्या चौकशीत बॉम्बस्फोटामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या सीमकार्डचा वापर झाल्याची माहिती उघड झाली होती. ही कार्ड त्यांनी गर्ग व इक्बाल यांच्याकडून घेतली होती. या सीमकार्डचा वापर त्यांनी कुठे व कशाप्रकारे केला याबाबतचा तपास करण्यासाठी सरकारी वकील एस. एम. कदम यांनी आरोपींना पोलीस कोठडीची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली.  

Story img Loader