पुणे : पुणे शहरातील खड्डे मुक्त रस्ता अशी ओळख जंगली महाराज रस्त्याची आहे. सुमारे ४४ वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाच्या दर्जामुळे जंगली महाराज रस्ता प्रसिद्ध आहे. मात्र या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे आता हा रस्ता चांगलाच चर्चेत आला आहे. तसेच या रस्त्यावर महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबत देखील आता शंका व्यक्त केली जातात
महापालिकेने दोन वर्षांपूर्वी साडेचार कोटी रुपये खर्च करून जंगली महाराज रस्त्यावर बांधलेले पावसाळी गटार खचले. यामुळे येथे भर रस्त्यात मोठा खड्डा पडला आहे. महापालिकेच्या पथ विभागाने घटनास्थळी जाऊन केलेल्या पाहणीत आजूबाजूची जमीन जवळपास पाच फुटांपेक्षा अधिक खचल्याचे समोर आले. त्यानंतर, पथ विभागाने तातडीने येथील रस्ता बंद करत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
हेही वाचा – पुणेकर सावधान! रस्त्यांवरून धावताय मृत्यूचे सापळे, प्रवाशांचा जीव धोक्यात?
जंगली महाराज रस्त्यावर हाॅटेल शुभमच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य संघटक प्रशांत कनोजिया यांना रस्त्यावर खड्डा पडलेला दिसला. या खड्ड्याच्या आसपासच्या रस्त्याला अनेक भेगा पडलेल्या त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी जवळ जात खड्ड्याच्या आत पाहिले असता हा रस्ता वजन पडल्यावर अधिक खचेल आणि यामध्ये छोटी गाडी पूर्ण आत जाईल असे त्यांच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कनोजिया यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.
पथ विभागाचे रस्ते दुरुस्तीचे वाहन तातडीने त्या ठिकाणी आले. कर्मचाऱ्यांनी या खड्ड्याच्या आसपासचा भाग खोदला असता पावसाळी वाहिनीचे गटार आतून खचल्याचे लक्षात आले. हा रस्ता बॅरिकेट लावत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर तातडीने त्याची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा – द्रुतगती मार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
जंगली महाराज रस्त्यावर २०२२ आणि २०२३ मध्ये महापालिकेकडून तब्बल साडेचार कोटींचे पावसाळी पूर व्यवस्थापनाचे काम करण्यात आले आहे. अर्बन स्ट्रीट अंतर्गत या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ करण्यात आले होते. त्याखाली पावसाळी वाहिन्याही टाकण्यात आल्या आहेत. मात्र, या वाहिन्यांमध्ये पाणी जाण्यासाठी लहान जलवाहिन्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने मागील वर्षी मोठ्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. तसेच पावसाळी गटारांचा आकारही वाढविला आहे. मात्र, दोन वर्षांतच हे गटार खचल्याने महापालिकेकडून केलेल्या कामाची गुणवत्ता यानिमित्त समोर आली आहे.