पादचारी सुरक्षा धोरणाअंतर्गत रस्त्याचे रूप पालटणार
शहरातील महत्त्वाचा रस्ता असलेल्या जंगली महाराज (जेएम रोड) रस्त्याचे येत्या काही दिवसांमध्ये रुपडे पालटणार आहे. पादचारी सुरक्षितता धोरणाअंतर्गत या रस्त्याची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार नव्याने पदपथांची निर्मिती, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, पथदिव्यांची नवी रचना अशी कामे आराखडय़ानुसार महापालिकेच्या पथ विभागाकडून हाती घेण्यात आली आहेत.
शहरातील रस्त्यांपैकी जंगली महाराज रस्ता हा एक प्रमुख रस्ता आहे. महापालिकेच्या पथ विभागाकडून काही दिवसांपूर्वी शहरातील प्रमुख पंधरा रस्त्यांची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. महापालिकेने पादचारी सुरक्षा धोरणाला मान्यता दिली आहे. या धोरणानुसार प्रमुख रस्त्यांच्या बाजूला सुरक्षित आणि विना अडथळा पदपथ, विशेष व्यक्तींसाठी खास सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था अशा काही बाबी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार या धोरणानुसार जंगली महाराज रस्त्यावर सर्वप्रथम हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी रस्त्याचा आराखडाही नव्याने बनविण्यात आला असून टप्प्याटप्याने ही कामे करण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून झाशीची राणी चौकातील बालगंधर्व रंगमंदिर पोलीस चौकीपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षांत या रस्त्यावरील पदपथांची दुरुस्तीही करण्यात आली नव्हती. आता नव्याने पदपथांची निर्मिती होणार असून पदपथ समपातळीवर तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. मॉर्डन कॅफेपासून गरवारे पुलापर्यंत हे काम टप्प्याटप्प्याने होणार असून बालगंधर्व ते संभाजी उद्यानाजवळील काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
‘विनाअडथळा पदपथांच्या निर्मितीसाठी काही रस्ते निश्चित करण्यात आले होते. या रस्त्यांच्या पुनर्रचनेसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली होती. त्यानुसार ही कामे सुरू झाली आहे. जंगली महाराज रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर फग्र्युसन रस्त्याचे काम हाती घेण्यात येईल,’ असे राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रस्त्याची पुनर्रचना होणार असल्यामुळे पार्किंगच्या रचनेमध्येही बदल होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली. मात्र रस्त्याची पुनर्रचना होणार असली, तरी रस्त्यावरील वाहतूक लक्षात घेऊन रस्त्याची रुंदी मात्र कायम ठेवण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील सर्व काम येत्या चार महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.