कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील वाघ, बिबटे, मोर आदी प्राण्यांना दत्तक घेण्याशाठी आतापर्यंत कोणी ना कोणी प्राणिप्रेमी पुढे येत होते; पण हत्ती दत्तक घेण्याची तयारी मात्र कोणीच दाखवली नव्हती. मात्र, आता हत्तीलाही एक महिन्यासाठी दत्तक घेण्यात आले असून त्यासाठीचा एका महिन्याचा पंचेचाळीस हजार रुपये इतका खर्च डॉ. प्रसाद जोशी यांनी दिला आहे.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील प्राणी दत्तक देण्याची योजना २०१० मध्ये सुरू करण्यात आली असून आतापर्यंत अठ्ठावन्न नागरिकांनी या योजनेला प्रतिसाद देत वाघ, बिबटे, अस्वल, कासव, मोर, चितळ, हरीण, चौसिंगा आदी प्राणी दत्तक घेतले आहेत. त्यासाठीचा खर्च प्रतिमहिना चार हजार ते पंचेचाळीस हजार रुपये इतका आहे. आप्तेष्टांचे वाढदिवस वा अन्य काही कार्यक्रमांच्या निमित्ताने प्राणी दत्तक घेतले जातात.
नागरिकांना वन्यप्राण्यांचे निसर्गातील महत्त्व समजावे, प्राणिसंवर्धनात त्यांचा सहभाग व्हावा तसेच प्राणिमात्रांबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आल्याचे प्राणिसंग्रहालयाच्या शिक्षण अधिकारी अश्विनी शितोळे यांनी सांगितले. नागरिकांच्या सहभागातून प्राणी दत्तक योजनेत आतापर्यंत पंधरा लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.
प्राणिसंग्रहालयात जानकी ही हत्तीण असून तिला आतापर्यंत कोणीच दत्तक घेतले नव्हते. संग्रहालयात गेल्यानंतर ही माहिती समजली आणि एका महिन्यासाठी हत्ती दत्तक घेण्याचा निर्णय घेतला, असे डॉ. प्रसाद जोशी (गुरुजी) यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ते गोखलेनगरमध्ये राहणारे असून पौरोहित्य, वास्तुसल्ला आदी कामांबरोबरच त्यांचा धूप उत्पादनाचाही व्यवसाय आहे. ‘हत्तीबद्दल मला आवड आहेच आणि प्राणिमात्रांबद्दलही प्रेम आहे. प्राणिसंग्रहालयातील हत्ती आतापर्यंत कोणी दत्तक घेतला नव्हता. त्यामुळे हत्ती दत्तक घेण्याचा निर्णय घेतला,’ असे डॉ. जोशी म्हणाले.

Story img Loader