पिंपरी : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांची सुरू असलेली पदयात्रा बुधवारी रात्री दहा वाजता पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली. या पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण करत एक मराठा, लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण या घाेषणेने परिसर दुमदुमून गेला. दुपारी बारा वाजता नियोजित असलेली पदयात्रा रात्री दहा वाजता शहरात दाखल होऊनही लोकांमधील उत्साह कायम होता.दरम्यान, पदयात्रेमुळे सकाळपासून शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला होता. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
रात्री दहाच्या सुमारास लाखाेंचा संख्येने जरांगे-पाटील यांचे शहराच्या हद्दीत पिंपळेनिलख येथील रक्षक चाैकात आगमन झाले. जरांगे यांचे ठिकठिकाणी जेसीबी, क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. मुस्लिम बांधवांनीही जरांगे यांचे स्वागत केले. लाखाे आंदाेलक त्यांच्या समवेत पदयात्रेत सहभागी झाले आहेत.
हेही वाचा >>>विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर आता लाल किंवा हिरव्या रंगाचा ठिपका, शिक्षण विभागाचा नवा निर्णय काय? वाचा सविस्तर
पुणे शहरातूनच पदयात्रेला बाहेर पडण्यासाठी रात्रीचे साडे नऊ वाजले. जरांगे-पाटील पुणे शहरात असतानाच नागरिक पिंपरी-चिंचवड मधील पदयात्रेच्या मार्गावर दाखल झाले हाेते. यात्रेतील नागरिकांचे स्वागत करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी मराठा बांधव, राजकीय पदाधिकाऱ्यांनी स्वागत कमानी, फलक उभारले हाेते. पदयात्रा जाण्याच्या मार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ध्वनीवर्धक उभारले होते. सायंकाळनंतर गर्दीत भर पडली. नागरिक भगव्या टोप्या परिधान करून, भगवे उपरणे गळ्यात घालून रस्त्यावर उतरले. रस्त्यावर गर्दी उसळली होती. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूला आंदाेलकांसाठी विविध संस्थांच्या वतीने जेवण, नाष्टा, पाणी, राहण्याची साेय करण्यात आली. लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना जेवण देण्यात आले. भक्ती-शक्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याला जरांगे यांनी अभिवादन केले. चौकात मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली होती. पदयात्रा जगताप डेअरी, डांगे चौक, चापेकर चौक, चिंचवड स्टेशन, खंडोबामाळ चौक, टिळक चौक भक्ती-शक्ती, देहूरोड, तळेगावदाभाडे मार्गे मध्यरात्री लोणावळ्याकडे रवाना झाली.
हेही वाचा >>>मनाेज जरांगेंची पदयात्रा पुण्यात; नगर रस्ता बारा तास बंद, शहरभर वाहतूक कोंडी
महिला, युवकांची संख्या लक्षणीय
जरांगे-पाटील यांच्या आंदाेलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. या आंदाेलनात प्रामुख्याने युवक, युवतींसह महिलांची संख्या लक्षणीय दिसून येत हाेती. पदयात्रेला पाठिंबा देण्यासाठी महिला, युवती रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर थांबल्या होत्या. पाठिंबा दर्शविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा बांधव दुचाकी, पायी लाेणावळ्याकडे मार्गस्थ होताना दिसले.
पाेलिसांचा कडक बंदाेबस्त
मराठा आंदाेलक शहरात लाखाेंच्या संख्येने दाखल झाले. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पाेलीस आयुक्तालयाच्या वतीने तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, सहा उपायुक्त, १२ सहायक आयुक्त, ६० पाेलीस निरीक्षक, १०० सहायक निरीक्षक असे एक हजार २०० पाेलीस कर्मचारी तैनात करण्यात आले हाेते.