ज्यांना स्वतःचे आणि स्वतःच्या लोकांचे हितसंबंध जपायचे असतात, ते धर्मांधता असलेले चित्रपट बनवतात. ज्यांना आपले चित्रपट हिट आणि लोकप्रिय करायचे असतात ते असे करूच शकत नाहीत. तसेच ज्यांना आपले अस्तित्त्व दाखवायचे असते आणि ज्यांनी आयुष्यात काहीच केलेले नसते, ते कोणतेही कारण काढून चित्रपटांना विरोध करत असतात. अशी भूमिका गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी सध्याच्या चित्रपटांबद्दल पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.
जावेद अख्तर म्हणाले की, “ओटीटी हे खूप चांगले सर्जनशील माध्यम आहे. त्याचा प्रेक्षक आणि चित्रपट तयार करणाऱ्या दोघांनाही उपयोग होत आहे. काही विषय असे असतात, की जे दोन तासांच्या चित्रपटातून मांडता येत नाहीत. त्यासाठी अनेक भाग गरजेचे असतात. अशा वेळी ओटीटी या माध्यमातून अनेक मोठे विषय दाखवता येतात. ओटीटीमुळे खूप बोल्ड विषयांना हात घालता येतो. त्यामध्ये अनेक प्रयोग करता येतात. या पिढीकडे मोबाईल सारखी साधने असल्याने ते या पिढीचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.”
ते पुढे म्हणाले की, “१९५० च्या दशकातील नायक हा कामगार वर्गातून येणारा होता. मात्र ९० च्या दशकात नायक हा कामगार वर्गातील नव्हता. त्याला या देशातील सामाजिक राजकीय परिस्थितीची पार्श्वभूमी आहे. आता पुन्हा गोष्टी बदलत आहे. छोट्या गावांतून चित्रपट येत आहेत. त्यामध्ये भारतातील या छोट्या गावांचे चित्रण आहे आणि हे चित्रपट मोठ्या शहरातील लोक मल्टिप्लेक्समध्ये बघत आहेत.”
“इंग्रजी आलेच पाहिजे पण मातृभाषेला पर्याय नाही. मातृभाषेशिवाय तुमचे अस्तित्व नाही. मातृभाषा येत नसेल, तर जमिनीशी तुमचे नाते संपते. आम्ही मुंबईत आल्यानंतर आम्हाला समजले की मराठीमध्ये किती समृद्ध ज्ञान आहे आणि माझ्यामते विजय तेंडुलकर हे भारतातील सर्वश्रेष्ठ नाटककार आहेत,” असे त्यांनी सांगितले.