प्रदीर्घ काळचा मित्र गमावल्याची खंत -नारळीकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : ज्येष्ठ खगोल भौतिकशास्त्रज्ञ शशिकुमार चित्रे यांच्या निधनाने प्रदीर्घ काळचा मित्र गमावला, अशा शब्दांत ज्येष्ठ खगोल वैज्ञानिक जयंत नारळीकर यांनी कल्याणच्या आकाशमित्र संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चित्रे यांना श्रद्धांजली वाहिली.

डॉ. चित्रे व डॉ. नारळीकर हे ब्रिटनमध्ये एकाच वेळी वास्तव्यास होते, त्या वेळच्या आठवणीही डॉ. नारळीकर व त्यांच्या पत्नी डॉ. मंगला नारळीकर यांनी यानिमित्ताने जागवल्या. चित्रे यांच्याशी पहिली भेट मुंबईहून लंडनला जात असताना बोटीवर झाली, १८ दिवसांच्या प्रवासात एक मराठी व्यक्ती आहे म्हटल्यानंतर त्यांच्याशी ओळख झाली. ते मात्र मला आधीच ओळखत होते, असे नारळीकर यांनी सांगितले.

पु. ल. देशपांडे केंब्रिजला आले होते, तेव्हा प्रिन्सेस स्ट्रीटवर चित्रे व नारळीकर गर्दी न्याहाळत होते. त्या वेळी पु. ल. देशपांडे यांना या गर्दीत कुणी तरी मराठी माणसे असल्याचे कळले. नंतर त्यांच्याशी भेट झाली व आम्ही त्यांना केंब्रिजची सफरही घडवली. निरोप द्यायची वेळ आली, तेव्हा त्यांनी ‘बटाटय़ाची चाळ’मधील एक चिंतन हे प्रकरण वाचून दाखवले, असे नारळीकर यांनी सांगितले.

‘‘आम्ही दोघे केंब्रिजला भेळ मिळत नाही म्हणून लंडनमध्ये भेळ खाण्यासाठी आलो. अचानक मागून कुणी तरी माझ्या पाठीवर थाप मारली, ‘काय जयंतराव कसे काय?’ असे ती व्यक्ती म्हणाली, मागे वळून पाहतो तर ते होते प्रल्हाद केशव अत्रे. चित्रे व मी दोघेही या भेटीने भारावून गेलो. आम्ही लंडनला भेळ खाण्यापेक्षा ब्रिटिश ब्रेकफास्ट का करीत नाही, असा प्रश्न त्यांनी केला. जिथे जे मिळत नाही त्याची उत्कंठा असते, असे उत्तर मी दिले. नंतर अत्रेंनी ‘मराठा’मध्ये ‘नारळीकरांच्या तपोवनात आचार्य अत्रे’ असा अग्रलेखच लिहिला होता’’, अशी आठवण नारळीकर यांनी सांगितली.

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant narlikar pay tribute to astrophysicist shashikumar chitre zws