विश्वाची निर्मिती आणि रचनेचा मागोवा घेणारी ‘बिग बँग’ संकल्पना.. अवकाशातील ग्रह आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची गुपिते.. खगोलशास्त्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन.. गणित विषयातील  गमतीजमती.. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आणि गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर दांपत्याच्या दिलखुलास संवादातून जीवनाचे तत्त्वज्ञान रविवारी उलगडले.
एकाकी व्यक्तींसाठी कार्यरत असलेल्या आनंदयात्रा स्वमदत गटाच्या सभासदांशी नारळीकर दांपत्याने संवाद साधला. गटाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. हेमंत देवस्थळी आणि मृणालिनी काळे यांनी त्यांची मुलाखत घेतली. विज्ञाननिष्ठ समाजामध्ये अंधश्रद्धा वाढीस लागत असल्याची खंत व्यक्त करीत डॉ. नारळीकर म्हणाले, असुरक्षित वाटू लागते त्या वेळी माणूस अंधश्रद्धेच्या आहारी जातो. दिवसभर प्रयोगशाळेत संशोधन कार्य करणारे शास्त्रज्ञ घरी परतल्यानंतर कर्मकांडामध्ये गुंतलेले दिसतात. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठीचे प्रभावी माध्यम म्हणून मी विज्ञानकथा लेखनाकडे वळलो. मराठीमध्ये विज्ञानकथा लेखनाचा फारसा प्रयत्न झालेला नाही. त्या तुलनेत इंग्रजीमध्ये विज्ञानकथा अधिक प्रमाणात आहेत.
विश्व प्रसारण पावते म्हणजे काय आणि आकाशगंगेतील अंतर दूर होते अशा सामान्य माणसांची थेट संबंध नसलेल्या कुठल्याशा मुद्दय़ावरून संशोधन करीत शास्त्रज्ञ भांडत बसतात, अशी गोड तक्रार डॉ. मंगला नारळीकर यांनी केली. मी मात्र, घर आणि घरातील माणसांना प्राधान्य देण्याचे ठरविल्याने करिअरकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे गणित विषयामध्ये संशोधन करता आले नसले तरी गणित विषय शिकवायला आवडते, असेही त्यांनी सांगितले.
जीावनाचे गणित सोडवावे
जगामध्ये सुखी कोणीच नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख-दु:खाचे वाटप असमतोल स्वरूपाचेच असते. एकाकी जीवन हा त्याचाच एक भाग आहे. माझ्याच वाटय़ाला जास्त दु:ख का, असे कुढत बसण्यापेक्षाही जे आले त्याचा स्वीकार करून सकारात्मक काम कसे करू शकतो हे ध्यानात घेऊन जीवनाचे गणित सोडवावे, असे डॉ. मंगला नारळीकर यांनी सांगितले.

Story img Loader