पुणे : केंद्रीय गृहमंत्री, सहकारमंत्री अमित शाहा काल पुण्यात आले होते. त्यांच्याबरोबरच्या चर्चेत महायुतीबाबतची थोडी चर्चा झाली. ८० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प केंद्राच्या निधीतून राज्यात चालले आहेत. विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे स्टेशन, रेल्वे मार्ग, मेट्रो याबाबत जास्त चर्चा झाली. जयंत पाटील आणि अमित शाहा यांची भेट झाली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील हे शरद पवार यांच्याबरोबर होते. त्यामुळे ते भेटलेले नसताना विनाकारण बातम्या दिल्या जातात, असे पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले.
पवार म्हणाले, की राज्यातील सहकार क्षेत्राबाबत अमित शाहा यांच्याशी चर्चा झाली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना इथेनॉल प्लॅन्ट लावण्यासाठी मदत केली जाईल. त्यासाठी राज्याने प्रस्ताव सादर करावेत. अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना एनसीडीसीकडून मदत केली जाईल. मात्र, कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थापन, संचालक मंडळाने पूर्ण केली पाहिजे. अमित शाहा यांनी केलेल्या कौतुकाबाबत पवार म्हणाले, की वडीलधाऱ्यांचा आदर करणारी आम्ही माणसे आहोत.
राज्याचा विकास करण्यासाठी, लोकप्रतिनिधींचे प्रश्न सोडवणे, आपल्या भागाचा कायापालट करण्यासाठी मी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. देशात नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा मजबूत नेता दिसत नाही. नरेंद्र मोदी यांनी रेल्वे स्थानके सुधारण्यासाठी योजना सादर केली. त्याच्या पहिल्या टप्प्यातीस १२६ स्थानकांमध्ये राज्यातील ४४ स्थानके आहेत. त्यांना ४० कोटींचा निधी दिला जाणार आहे. रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळतील. राज्यातील विकास कामे करायची आहेत. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्राधान्याने करायचे आहे. रिंग रोडच्या कामाला गती दिली आहे. पुणे-नाशिक रेल्वेबाबतही अमित शाहा यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी तो विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. वीस-बावीस वर्षे होत नसलेले विषय केंद्र सरकार धाडसाने करत आहे.