पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ कात्रज येथील स्व. अजितदादा बाबर भाजी मंडईच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा आयोजित केली होती. या सभेत केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर त्यांनी टीका केली. त्या सभेनंतर जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत सोबत संवाद साधत अनेक राजकीय घडामोडी बाबत भाष्य देखील केले.
आणखी वाचा-धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
कासेगाव या ठिकाणी असलेल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या जागेवरून सांगली येथील भरसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुमच्यावर टीका केली. त्या प्रश्नावर प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, पोलिस स्टेशन अतिशय चांगल्या इमारतीमध्ये आहे. फार चांगली इमारत आहे. तिथे गुन्हे कमी झालेले आहेत. पुण्यात ते (अजित पवार) इतकी वर्ष पालकमंत्री असताना, पुण्यात किती गुन्हे वाढले आहेत. कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलिस स्टेशनवर बोला अशा शब्दात जयंत पाटील यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून निशाणा साधला. आता यावर अजित पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.