राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. पाटील त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. आरतीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी दसरा मेळाव्यावरुन भाजपासह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. तर उडत्या बसवरुन नितीन गडकरींनाही टोला लगावला आहे.
नितीन गडकरींना टोला
दुपारपासून मी पुण्यातील वेगवेगळ्या भागातील गणपतीचे दर्शन घेतलं आहे. रस्त्यावर भाविकांची प्रचंड गर्दी आहे. मी उडत्या बसची वाट बघितली त्यामुळे वेळ झाला. अजून उडती बस सुरू झाली नाही हे लक्षात आलं म्हणून मग चालतच सगळ्या गणपतीच्या दर्शनाला आलो, अस म्हणत त्यांनी नितीन गडकरींना टोला लगावला आहे. तसेच हा देश हुकूमशाही प्रवृत्तीच्या हाती जात आहे, या निष्कर्षवर सगळे पक्ष आले आहेत. त्यामुळे देशातील सर्व पक्ष एकत्रीत यायला सुरूवात झाली आहे, असं म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली आहे.
हेही वाचा- पुणे : साडेतीन लाख पुणेकरांनी जोडले मतदार यादीला आधार
दसरा मेळाव्यावरुन शिंदे गटाला टोला
दसरा मेळावा हा शिवसेनेचाच बाळासाहेब ठाकरे जिकडे तिकडे दसरा मेळावा. बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळावा सुरू केला. शिवसेनेचा दसरा मेळावा हाच खरा दसरा मेळावा. चिन्ह इकडे तिकडे जाईल पण दसरा मेळावा त्यांचाच आहे, असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.