पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच करोनावरील लस उपलब्ध झाली आणि देशातील जनतेचे प्राण वाचले, त्यामुळे या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना मत देऊन मोदींना विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. या अर्थानेच मग काँग्रेसच्या काळात पोलिओची लस तयार झाली होती. त्यामुळे फडणवीसांनी आता काँग्रेसला मत द्यावे, असे ते म्हणाले. ते पुण्यातील एका प्रचारसभेत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
“एका प्रचारसभेत बोलताना, पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच करोनावरील लस उपलब्ध झाली, त्यामुळे मोदींना मत द्या, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मग याच अर्थाने काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काळात पोलिओची लस तयार झाली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मत द्यावे”, असा टोला जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे.
हेही वाचा – “मोदी सरकारचं गुजरातप्रेम अन् महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष…”, कांदा निर्यातीवरील बंद…
“आज देशात मत मागाच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. खरं तर गेल्या १० वर्षात मोदींना काय केलं, हे फडणवीसांनी सांगितले पाहिजे. पण दुर्दैवाने त्यांना कोणतेही काम सांगता येत नाही. ज्यावेळी महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातमध्ये गेले, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही. ही सगळी लोक शरण गेलेली लोक आहेत. अशी लोक राज्याचा विकास करू शकत नाही. महाराष्ट्र हा लढणाऱ्या लोकांचा आहे. त्यामुळेच शरद पवारांच्या मागे आज संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे”, असेही ते म्हणाले.
फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि बार्शी शहरात आयोजित एका प्रचारसभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी करोना लसीचा दाखला देत भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. “आज इतर मुद्दे बाजूला ठेवा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयी करण्याची महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा कारण पंतप्रधान मोदींनी करोना काळात आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवले. पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ स्वतःची लस तयार केली नाही, तर इतर देशांनाही पुरवली,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.