पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक देश, एक निवडणुकीचा नारा देत आहेत. प्रत्यक्षात एक निवडणूक आयुक्त, एक निवडणूक, अशी स्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी राजीनामा का दिला, हे देशासमोर आले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी केली.
पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. अशा काळात केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. २०२७ पर्यंत कार्यकाळ असणाऱ्या अधिकाऱ्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा का दिला? त्यांच्या राजीनाम्यामागचे खरे कारण देशासमोर आले पाहिजे. केंद्रीय निवडणूक आयोगात एक मुख्य आयुक्त आणि अन्य दोन आयुक्त असतात. यापूर्वीच आयोगातील एक आयुक्तपद रिक्त होते, आता गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर आयोगाला एकच मुख्य निवडणूक राहिले आहेत. केंद्र सरकार एक देश, एक निवडणुकीचा नारा देत होते, प्रत्यक्षात एक आयुक्त, एक निवडणूक, अशी स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
हेही वाचा >>>‘कसली रे कोयता गँग, यांचा सुपडाच साफ करतो’; अजित पवारांची पुण्यातील गुन्हेगारांना तंबी
वंचित सोबतची चर्चा अंतिम टप्प्यात
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरे गट या तीन पक्षांत जागावाटपाची चर्चा झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांच्याशी जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. लोकसभा निवडणुकीसाठीची महाविकास आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी दोन दिवसांत जाहीर होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
अजित पवार यांची बैठकीला पुन्हा दांडी
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा दांडी मारली. संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला व्हीएसआयचे संचालक, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि व्हीएसआयचे उपाध्यक्ष व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दांडी मारली.