पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीबाबत आम्ही अद्याप विचार केलेला नाही आणि पक्षामध्ये त्या दृष्टीने चर्चाही केलेली नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी मांडली. पाटील यांनी रविवारी बापट यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर लढण्यास काँग्रेस उत्सुक असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले होते. त्यांच्या निधनाला तीन दिवस झाले असून, इतक्यात गुढघ्याला बाशिंग बांधण्याची घाई का, असा सवाल करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगा’, अशा कानपिचक्या दिल्या होत्या. अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही भूमिका मांडली आहे.
हेही वाचा – पोषण आहाराचे धान्य निकृष्ट आढळल्यास कारवाई; भरारी पथकांमार्फत धान्याची तपासणी बंधनकारक
हेही वाचा – पुणे : कात्रजमध्ये कोयता गँगची दहशत; अल्पवयीन मुलांकडून एकावर कोयत्याने वार
पाटील म्हणाले की, बापट साहेबांचे नुकतेच निधन झाले आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात आम्ही अद्याप विचार केला नाही. आम्हाला बापटसाहेबांबद्दल आदर आहे. आमचे नेते शरद पवार यांनीदेखील त्यादिवशी सर्व कार्यक्रम रद्द केले आणि ते गिरीश बापट यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. आम्ही अजून पुणे लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केलेली नाही.