मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचं जोरदार आगमन झालं आहे. मात्र पहिल्याच पावसांत अनेक शहरांची स्थिती गंभीर झाली आहे. मुंबई आणि पुण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र शनिवारी (८ जून) पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे पुण्यात १५ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पाषाण, सिंहगड रस्त्यावरील इमारतीतील तळमजल्यावर पाणी साचलं. पुणे शहर, परिसरात शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला होता. डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, नगर रस्ता, धानोरी, विमाननगर, सोलापूर, तसेच सातारा रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं होतं. तर काही ठिकाणी चार चाकी वाहनं बुडाली होती.
दरम्यान, पहिल्याच पावसात पुण्याची दयनीय अवस्था पाहून विरोधी पक्षांनी मागील पाच वर्षे पुणे महापालिकेची सत्ता सांभाळणाऱ्या भाजपावर टीका केली आहे. निवडणुकीचा कालावधी उलटून गेल्यामुळे सध्या पुणे महापालिका प्रशासकांच्या ताब्यात आहे. त्याआधी ही पालिका भाजपाच्या ताब्यात होती. भाजपाचे मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार होते.
पुण्याची दयनीय अवस्था पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून भाजपावर निशाणा साधला आहे. पाटील यांनी म्हटलं आहे की, काल (८ जून) पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!”
हे ही वाचा >> महाराष्ट्रातील सहा खासदारांचं मंत्रिपद पक्कं? NDA तील प्रमुखांच्या फोननंतर प्रतिक्रिया देत म्हणाले…
पुण्यातील रस्त्यांवर पाणी साचण्याला पुणे महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (कसबा पेठ मतदारसंघ यांनी केला आहे. एक्सवर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.धंगेकर म्हणाले, “एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे. प्रत्येक पुणेकर ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. पुढच्या ५० वर्षांचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे. प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत”