पुणे : चित्रपटातील दृष्यफिती, नाटकातील काही अंशांचे तसेच ‘सारे प्रवासी घडीचे’ या आत्मकथनपर लेखनाचे अभिवाचन अशा ‘कॅलिडोस्कोप’मधून ज्येष्ठ लेखक-नाटककार जयवंत दळवी यांचा लेखनप्रवास उलगडत मंगळवारी जन्मशताब्दीनिमित्त दळवी यांना अभिवादन करण्यात आले. ‘नातीगोती’ नाटकातील काटदरे दाम्पत्याचे स्वगत, ‘मोहिनी दिवाकर’ या व्यक्तिरेखेची तगमग आणि कोकणामध्ये सादर होणाऱ्या नाटकामध्ये द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाचे वर्णन अभिवाचनातून प्रभावीपणे सादर होत असताना दळवी यांच्या लेखन सामर्थ्याची कलाकारांच्या अभियनातून प्रचिती आली.
जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संवाद पुणे संस्थेच्या सहकार्याने आयोजित ‘कॅलिडोस्कोप : जयवंत दळवी’ या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन गिरीश जयवंत दळवी यांच्या हस्ते झाले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या जान्हवी जानकर, अभिवाचनात सहभागी झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्री स्वाती चिटणीस, अभिनेते संजय मोने, शैलेश दातार, राजेश दामले, सुनील महाजन, निकिता मोघे, सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते. नाटक, चित्रपटातील दृश्ये आणि सशक्त अभिवाचनातून जयवंत दळवी यांचे समग्र दर्शन घडले.
ज्येष्ठ समीक्षक रेखा इनामदार-साने, ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता, अभिनेते विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, प्रसाद ओक, शरद पोंक्षे यांनी दृक-श्राव्य प्रणालीद्वारे दळवी यांच्या लेखनाचे मर्म आणि व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले. ‘बॅरिस्टर’, ‘नातीगोती’, ‘सूर्यास्त’ या नाटकांमधील, ‘चक्र’, ‘रावसाहेब’, ‘महानंदा’, ‘उत्तरायण’, ‘पुढचं पाऊल’ चित्रपटांची झलक या निमित्ताने पाहायला मिळाली. सतीश जकातदार यांनी या कार्यक्रमासाठी संहितालेखन केले होते.
मोने म्हणाले, ‘आयुष्यात कधीही माणसांमध्ये न मिसळणाऱ्या दळवी हे त्यांच्या लेखनातून कायम माणसातच रमलेले दिसतात. व्याकरणातील सगळे रस त्यांनी लेखनात आहेत. रौद्र, बिभत्स, शृंगार, क्रोध रस वापरताना त्यांचा कधीही तोल गेला नाही. ढोल न पिटताही स्त्रीवादी लेखकाची भूमिका दळवी यांनी उत्तमपणे पार पाडली. ग्रामीण, शहरी पार्श्वभूमी, यांत्रिकीकरणामुळे झालेले बदल अशा विविध विषयांवरील उत्तम साहित्यकृतींची निर्मिती करणाऱ्या दळवी यांनी तटस्थपणे लेखन केले.’
दळवी यांच्या सहवासातील अनेक आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत, असे फुटाणे यांनी सांगितले. साहित्यिक कार्यक्रमाला पुणेकरांनी केलेली गर्दी हे आनंददायक दृश्य असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
अभिनेता म्हणून दळवी यांच्या नाटकामध्ये भूमिका केल्याने माणूस म्हणून माझ्या व्यक्तिमत्त्वात मोठा फरक पडला. माझ्या लेखनावर दळवी यांच्या लेखनाचा मोठा प्रभाव आहे.दिलीप प्रभावळकर, प्रसिद्ध अभिनेते