JEE Main Result 2025 : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) जानेवारीत घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यच्या (जेईई मेन्स) सत्र एक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात १४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले असून, त्यात राज्यातील विशाद जैनचा समावेश आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हिडिओ ॲनालिटिक्स तंत्राचा, ५जी जॅमर तंत्राचा वापर करण्यात आला. परीक्षेत गैरप्रकाराचा अवलंब केल्याचे निदर्शनास आलेल्या ३९ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला नाही. पेपर एकच्या दोन्ही सत्रांतील परीक्षांच्या निकालानंतर अंतिम क्रमवारी जाहीर केली जाणार आहे. पेपर दोनचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना jeemain.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असल्याचे एनटीएने स्पष्ट केले.
एनटीएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी अशा केंद्रीय संस्थांतील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवीपूर्व (बीई, बीटेक) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई मुख्य परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतली जाते. जेईई मुख्य परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा द्यावी लागते. त्यानुसार जानेवारी सत्राच्या पेपर एकसाठी देशभरातील ३०४ शहरांमधील ६२८ केंद्रांवर, तर परदेशातील १५ शहरांमध्ये परीक्षा झाली. परीक्षेत इंग्रजीसह १३ प्रादेशिक भाषांचे पर्याय उपलब्ध होते. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या १३ लाख ११ हजार ५४४ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ५८ हजार १३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी नोंदणी सुरू
जेईई मेन्सची दुसऱ्या सत्रातील परीक्षा १ ते ८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी २५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.